सध्या सगळीकडे रामायण आणि महाभारत या मालिकांची जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिका दूरदर्शनवर पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कुसुम’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री नौसीन अली सरदार चर्चेत आहे. या चर्चा ती मुस्लीम असल्यामुळे तिला हिंदू देवींच्या भूमिकेसाठी नाकारल्याचे तिने सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत.

नुकताच नौसीनने आयबी टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने, ‘कोणाचेही नाव न घेता मी तुम्हाला सांगू इच्छिते की, माझी काही भूमिकांसाठी निवड झाली होती. पण काही दिवसांनी त्यांनी मला घेण्यास नकार दिला. कारण त्या भूमिकेतील व्यक्तीरेखा हिंदू होत्या. “आम्ही तुझी निवड हिंदू देवीच्या भूमिकेसाठी करु शकत नाही” असे त्यांनी मला सांगितले. ते ऐकून मला धक्काच बसला’ असे नौसीन म्हणाली.

‘आपण २०२० मध्ये राहतो. मी हिंदू नसल्यामुळे मला त्या भूमिका दिल्या नाही हे ऐकून मला धक्काच बसला. मी त्या लोकांना सांगू इच्छिते की कलाकाराचा कोणताही धर्म नसतो. मी मुस्लीम असल्यामुळे मला हिंदू देवीची भूमिका मिळू शकत नाही हे जेव्हा प्रोडक्शन हाऊसने सांगितले तेव्हा मला असे वाटले की हिच मानसिकता देशाची विभागणी करते’ असे नौसीन पुढे म्हणाली आहे.