प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा अभिमान असतो. नवरा म्हणजे तिचा जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ. तसेच नवऱ्यासाठीदेखील त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं मनं जिंकण्यासाठी कलर्स मराठी ‘नवऱ्यासाठी’ एक अनोखं आव्हान घेऊन येत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं. पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या नवऱ्याला या खेळात भाग घ्यावा लागणार आहे. नवरा खेळणार आणि बायको जिंकणार असं या कार्यक्रमाच स्वरूप असेल. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री हर्षदा खानविलकर करणार आहे. येत्या १८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या ६.३० वा ‘नवरा असावा तर असा’ हा कार्यक्रम तुम्हाला कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येईल. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘नवरा असावा तर असा’ हादेखील अशाच पठीतील कार्यक्रम असल्यामुळे ‘होम मिनिस्टर’ला आता चांगली टक्कर मिळू शकते.

Raakshas Teaser Poster वाचा : ‘राक्षस’मध्ये दिसणार सई

आपल्याकडे अशी प्रथाच आहे की, घरातील बाई नेहेमी घरासाठी, आपल्या माणसांठी त्यांच्या सुखासाठी झटत असते. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असते. आपले दु:ख, आनंद, भावना बायका लगेचच व्यक्त करतात. तर, पुरूषांना व्यक्त होण्याची, स्वत:हून काही खास करण्याची संधी तशी कमीच मिळते. पण, या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच घरातील पुरुषमंडळींना संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांच्या बायकोला आवडणारी एखादी खास गोष्ट करण्याची संधी मिळणार आहे. जे पाहून त्यांच्या गृहलक्ष्मी नक्कीच त्यांच्यावर खूश होतील.
या कार्यक्रमामध्ये बायको नवऱ्यासाठी आव्हान ठरवणार आणि जिचा नवरा हे आव्हान पूर्ण करणार तोच त्या भागाचा विजेता ठरेल. यामध्ये एक गंमतही आहे. ती म्हणजे, जिंकणार नवरा पण बक्षीस मिळवणार बायको. इतकेच नाही तर विजेत्या कारभारणीला आकर्षक मंगळसूत्रही मिळणार. कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य असे की, हर्षदा खानविलकर स्पर्धक जोड्यांशी हितगुज करणार असून, जोडप्यांबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेईल.

वाचा : ‘प्रभो शिवाजी राजा’ मधून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

या कार्यक्रमाविषयी हर्षदा म्हणाली की, “मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटले. गेली सहा वर्षे मी एकचं भूमिका केली. ज्याला लोकांनी खूप प्रेमं दिलं, आदर दिला. आता कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भुमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानचं आहे. कारण, याआधी मी कधीच सूत्रसंचालन केले नाही. खरतरं मी खूप उत्सुक आहे. मी जी गोष्ट कधीच केली नाही ती मी आता करणार आहे. मी अजून एका गोष्टीसाठी उत्सूक आहे, ती म्हणजे ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं त्यांना हर्षदा खानविलकर म्हणून प्रत्यक्षात भेटण्याची संधी मला या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांचं असचं प्रेम यावेळेस देखील मला मिळेल.’