अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी याच्या पत्नीने गेल्या वर्षी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्याच्यापासून तिला घटस्फोटही हवा होता. पण आता मात्र तिने आपली बाजू बदलली आहे. एका मुलाखतीत तिने आपल्याला आय़ुष्य पुन्हा सुरु करायची इच्छा असल्याचं सांगितलं आहे.

नवाझुद्दिन सिद्दिकीची पत्नी आलिया उर्फ अंजना किशोर पांडेय हिने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती.  पण आता मात्र तिचं मतपरिवर्तन झालं असल्याचं तिने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ती म्हणते की, आता त्याची प्रेमळ बाजू पाहिल्यानंतर तिला त्याच्यापासून घटस्फोट नको आहे. ती म्हणाली होती की, तिच्या पतीने जरी तिच्यावर हात उचलला नसला तरी तिच्या दिराने म्हणजे नवाजच्या भावाने, शमासने तिला मारलं होतं.
पण आता एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की, तिला करोना संसर्ग झाला असताना तो पूर्ण परिवाराची काळजी घेत होता. त्याच्या या स्वभावामुळे तिला आता नव्याने सुरुवात करायची आहे.

आलिया पुढे म्हणाली, “गेल्या दहा दिवसांपासून मला करोना संसर्ग झाला असल्याने मी माझ्या मुंबईच्या घरात आयसोलेशनमध्ये राहत आहे. नवाज सध्या लखनौमध्ये त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि आमची मुलं यानी आणि शोरा यांची काळजी घेत आहे. तो व्यस्त असूनही आमच्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या गरजांची खूप काळजी घेत आहे. तो बऱ्याचदा मला फोन करतो आणि माझ्या तब्येतीबद्दल चौकशी करतो. मला नवाजचा हा स्वभाव फार आवडला. याआधी तो मुलांकडे फारसं लक्ष द्यायचा नाही. पण आता त्याचं वागणं बघून मला खरंच आश्चर्य वाटतंय. ”

दोघांमधले मतभेद दूर करण्याबाबत ती म्हणते, “मी आणि नवाज दोघेही आमच्यातले वाद, आमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढे जाऊन आम्ही हे प्रकरण सोडवू, आमच्यातले गैरसमज दूर करू. आम्ही सध्या याबद्दल चर्चा करत आहोत.”

नवाझुद्दिनला घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर तिने हा खुलासा केला होता की त्यांच्यात 2010 पासूनच वाद आहेत. ती यापूर्वी म्हणाली होती, “आमच्यातल्या या समस्या 2010 पासून म्हणजे आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षानंतरच सुरु झाल्या होत्या. मी बऱ्याच गोष्टी सांभाळत होते, पण आता मला ते नाही जमत आहे.”