नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज भलतीच गाजली होती. या सीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरले होते. आता एक मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकिने सेक्रेड गेम्स ३ बाबत वक्तव्य केले आहे. त्याने ही सीरिज जगभरात किती लोकप्रिय होती याचा देखील खुलासा केला आहे.

नुकताच नवाजुद्दीनने ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सेक्रेड गेम्स या वेब सीरिजविषयी वक्तव्य केले आहे. ‘सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचे संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले. मी रोममध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि तेथे लोकं माझ्याशी सेक्रेड गेम्स या वेब सीरिज विषयी बोलत होते. त्यामुळे आम्ही सीरिजचा दुसरा सीझन करण्याचा निर्णय घेतला’ असे नवाजुद्दीन म्हणाला.

आणखी वाचा : आता होणार ‘तांडव’, सैफच्या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

पुढे बोलताना नवाजुद्दीनने सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन प्रेक्षकांची निराशा करणारा होता असे म्हटले आहे. ‘कदाचित सेक्रेड गेम्स २ करण्यामागचा हेतू पहिल्या सीझन इतका प्रामाणिक नव्हता. मी मान्य करतो सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली.’ त्यानंतर नवाजला सीरिजच्या तिसऱ्या सीझन विषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्याने, ‘मूळ कादंबरीमधील कथा ही सेक्रेड गेम्सच्या दोन्ही सीझनमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये दाखवण्यासारखे काही उरले नाही’ असे म्हटले.