बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवून देतो. पण नवाजुद्दीनचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. एक वेळ अशी होती की त्याला चित्रपट मिळणेच बंद झाले होते आणि मिळालेल्या चित्रपटातून त्याचे रोल कट करण्यात आले होते.

नवाजुद्दीनने नुकताच स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कमल हासन यांनी चित्रपटातून त्याचा रोल कट केला होता असे सांगितले आहे. ‘मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत आणि एडिट करताना माझा रोल कट देखील करण्यात आला होता. मी २००० साली प्रदर्शित झालेल्या कमल हासन यांच्या हे राम चित्रपटासाठी डायलॉग कोच म्हणून काम करत होतो. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते’ असे नवाजुद्दीनने म्हटले.

‘जेव्हा कमल हासन यांनी चित्रपटात मला एक छोटी भूमिका दिली तेव्हा मी अतिशय खूश होतो. कारण मी त्यांना आदर्श मानत होतो आणि त्यांच्यासोबत मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पण एडिट करताना माझा रोल काट करण्यात आला. मला खूप वाईट वाटले. तेव्हा मी खूप रडलो. कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनने माझे सांत्वन देखील केले’ असे नवाजुद्दीनने पुढे म्हटले आहे.