‘सेक्रेड गेम्स’मधील गणेश गायतोंडे असो वा ‘गँग्स ऑफ वासेपुर’च्या दोन्ही भागातील फैजल खान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली. कायम विविधांगी भूमिकांना प्राधान्य देणारा नवाज लवकरच एका रोमँटिक चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच एका रोमँटिक चित्रपटात झळकणार असून यापूर्वी कधीही अशा चित्रपटामध्ये काम करण्याची संधी न मिळाल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.

‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटातून मी पहिल्यांदाच रोमँटिक अंदाजात दिसून येणार आहे. ”यापूर्वी अनेक वेळा मला असे चित्रपट करण्याची इच्छा होती. मात्र मला कधीच रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत. कदाचित माझा चेहरा रोमँटिक चित्रपटांसाठी योग्य नसल्याचं काहींना वाटत असेल. मात्र आता मला पहिल्यांदाच अशा धाटणीचा चित्रपट करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मी फार उत्सुक आहे’,’ असं नावजने सांगितलं.

दरम्यान, ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी नवाजुद्दीनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.