महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘ठाकरे’ असं या बायोपिकचं नाव असून नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे. नवाजुद्दीन या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याचा एक व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या लूकमधील नवाजची सर्वत्र चर्चा होत आहे.

संपूर्ण ब्लॅक अँड वाईट अशा व्हिडिओत फक्त बाळासाहेबांच्या लूकमधील नवाज आणि झेंडे भगव्यामध्ये पाहायला मिळत आहे. नवाजने या भूमिकेसाठी फार मेहनत घेतली आहे आणि ते या व्हिडिओत स्पष्ट होत आहे.

पाहा व्हिडिओ :

#ManikarnikaTrailer : ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत रहना चाहिए’; ‘मणिकर्णिका’चा दमदार ट्रेलर

शिवसेना खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. अभिजीत पानसे चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.