अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. या वृत्ताला एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. दीपिकाला २५, तर श्रद्धा आणि सारा यांना २६ सप्टेंबरला हजर राहण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी अमली पदार्थाचा संबंध आहे का? या मुद्दय़ासोबत हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) आणि अमली पदार्थ या समीकरणाबाबतही तपास सुरू आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.

तीन वर्षांपूर्वी करिश्माने एक व्यक्तीसोबत साधलेला संवाद पथकाच्या हाती लागला. त्यात करिश्मा ‘डी’ असे नाव सेव्ह केलेल्या व्यक्तीसोबत चरसबाबत चर्चा करत होती. ही डी नावाची व्यक्ती दीपिका असावी असा संशय पथकाला आहे.

मंगळवारी क्वानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चीतगोपेकर यांच्यासोबत करिश्माला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तब्येत बरी नसल्याने तिने वेळ मागून घेतला. एनसीबीने तिला २५ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले. त्याच दिवशी दीपिकाकडे चौकशी होणार आहे.

क्वान कंपनीच्या अधिकारी जया साहाची सुशांत मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि एनसीबीने चौकशी केली आहे.