अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन धागे उलगडले जात आहेत. या प्रकरणाचा एकीकडे सीबीआय तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे,” असं ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

“सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे. आजकाल त्याला माध्यमांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यापेक्षा अधिक माध्यमांवर त्याची अधिक चर्चा आहे,” असं मेमन म्हणाले. “ज्या वेळी कोणत्याही गुन्ह्याचा तपास सुरू असतो त्यावेळी त्याबद्दल माहिती गोपनीय ठेवणं आवश्यक असतं. कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक केल्यानं न्यायावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो,” असंही ते म्हणाले.

तपासात नवी माहिती

सध्या सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे रियावर मनी लाँड्रिंग प्ररकरणी गुन्हा दाखल झाला असून ईडीने तिची दोन वेळा चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान, रियाचे फोन कॉल्स डिटेल्स समोर आले. यात रियाने AU या व्यक्तीला जवळपास ६३ वेळा फोन केल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी रियाच्या टीमने AU ही व्यक्ती रियाची मैत्रीण असल्याचं म्हटलं आहे.