‘मसान’सारखी उत्कृष्ट कलाकृती साकारणारा दिग्दर्शक नीरज घायवान किती संवेदनशील आहे, हे दिसून आले आहे. मंगळवारीच नीरजला ‘मसान’साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० हजार रुपये त्याने महाराष्ट्रातील दुष्काळ पीडितांच्या मदतीसाठी देण्याचे जाहीर केले. त्याच्यासोबत वरूण ग्रोव्हर यानेसुद्धा याच कारणासाठी ५० हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आम्ही दोघे मिळून दुष्काळ निवारणाच्या कामासाठी एक लाख रुपये देणार आहोत, असे नीरजने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले.


नीरजला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर वरूण ग्रोव्हर याला त्याच्या ‘मोह मोह के धागे’ या ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या दोघांना प्रत्येकी सव्वा लाख रुपये इतकी पुरस्काराची रक्कम मिळाली आहे. त्यापैकी प्रत्येकी ५० हजार रुपये या दोघांकडून दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळाकडे सर्वांचे लक्ष वेधावे, यासाठीच आपण ही मदत देणार असल्याचे जाहीर केले, असेही नीरजने म्हणाला.