काही दिवसांपूर्वी अभिनेता वरुण धवन, मनीष पॉल आणि क्रिती सेनॉन या कलाकारांपाठोपाठ अभिनेत्री नीतू कपूर यांना करोनाची लागण झाली होती. आता त्यांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीने सोशल मीडियावर पोस्टद्वारे याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नीतू कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘तुम्ही सर्वांनी माझ्या आईसाठी प्रार्थना केल्याबद्दल तुमचे आभार. माझ्या आईचा करोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे’ असे रिद्धिमाने कॅप्शन दिले आहे.

नीतू कपूर आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होत्या. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्या प्रती काळजी आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर बाळगा आणि काळजी घ्या”, अशी पोस्ट नीतू कपूर यांनी केली होती.