अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा शमत नाही तोच नेहा धुपियाच्या गुपचूप लग्नाच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोणताही गाजावाजा न करता अभिनेता अंगद बेदीशी नेहाने लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अनेकांकडून बरेच प्रश्न निर्माण केले गेले. इतकंच नव्हे तर प्रेग्नन्सीमुळे तिने दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगदशी घाईगडबडीत लग्नगाठ बांधली असेही तर्क लावले जाऊ लागले.

सोशल मीडियावरील ट्रोल आणि नेटीझन्सचे आरोप फेटाळत नेहाच्या वडिलांनी तिच्या लग्नाआधी गरोदर असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ‘व्यग्र वेळापत्रकामुळे नेहा आणि अंगद यांना लग्नासाठी फार वेळ देता येत नव्हता. त्यामुळे तारीख ठरवून घाईगडबडीत हे लग्न पार पडलं. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे आम्हाला ठाऊक होतं. लग्नाविषयी बोलण्यासाठी ते आमच्याकडे कधी येतात, याचीच आम्ही वाट पाहत होतो,’ असंही नेहाच्या वडिलांनी सांगितलं.

१० मे रोजी दिल्लीत नेहा आणि अंगद विवाहबंधनात अडकले. नेहा ३७ वर्षांची आहे तर अंगद तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजेच ३५ वर्षांचा आहे. याच कारणावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला.

अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता.