अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. बऱ्याचदा ती सामाजिक मुद्द्यांवर तिचं मत मांडत असते. काही दिवसांपूर्वी ‘रोडीज’मधील एका स्पर्धकाला खडे बोल सुनावल्यामुळे ती चर्चेत आली होती. ‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’, असं वक्तव्य नेहाने केलं होतं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या वक्तव्यानंतर नेहाने तिचं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे आजही मी या मतावर ठाम असल्याचं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

काही दिवसापूर्वी नेहाने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे. “रो़डीज हा रिअॅलिटी शो आहे आणि मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्यावर मी या शोमध्ये व्यक्त झाले. खरं तर त्यावेळी मी जे काही बोलले होते. त्यातील फक्त एका लहानशा भागाचा गाजावाजा करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये कौटुंबिक हिंसाचार करणं योग्य नाही हे मला त्यावेळी सांगायचं होतं. मात्र माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. त्या वाक्यातील केवळ एकाच ओळीवरुन मला ट्रोल करण्यात आलं”, असं नेहाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “मला जे विचार मांडायचे होते ते मी विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे मांडले. आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम असून हेच माझे विचार आहेत. जर तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असाल आणि ते सहन करत असला तर त्याचे परिणाम हे अत्यंत घातक आणि थक्क करणारे असतात. या हिंसाचारामुळे तुम्ही मनातून खिन्न झाले असता त्यामुळे बऱ्याच वेळा अशा घटनांमध्ये व्यक्तींमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ येते”.

दरम्यान, नेहा सध्या छोट्या पडद्यावरील ‘एमटीव्ही रोडीज’ या शोमध्ये परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच झापलं. ‘एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही’, असं नेहा म्हणाली. परंतु तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. ‘प्रत्येक वेळी उपदेशाचे डोस पाजायचे नसतात’, असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.