देशात करोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने चिंतादेखील वाढू लागली आहे. सरकारकडून लसीकरण वाढवण्यात आलं असलं तरी रुग्णसंख्यादेखील झपाट्याने वाढतेय. यासाठीच प्रशासनाकडून सर्व नियमांचं पालन करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करणं, सुरक्षित अंतर राखणं, विना कारण गर्दी न करणं अशा सूचना सरकराकडून केल्या जात असतानाही अनेक ठिकाणी या सर्व नियमांचं उल्लघन होताना दिसतं आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया हिने दिल्ली विमानतळावरील एक फोटो शेअर करत लोकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी आवाहन केलं आहे. तसचं तिने लोकांच्या निष्काळजीपणावर चिंता व्यक्त केली आहे. नेहा धुपियाने विमानतळावरील गर्दीचा एक फोटो ट्विट करत म्हंटलं आहे,” सकाळी एअरपोर्टवर लोक रांगा मोडून म्हणतात आम्हाला लेट होतंय आणि आम्ही रांगेत उभं राहण्यासाठी लवकर उठतो. हनुवटीपर्यंत अर्धवट मास्क घालतात आणि म्हणतात आरामदायक नाही आणि आम्ही काळजी घेत पूर्ण मास्क घालतो. जरा सुधरा, स्वत:साठी आणि आपल्या आसपासच्या लोकांसाठी जरा सुधरा.” असं नेहाने तिच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

लोकांना करोनाची चिंता नाही वाटतं?
नेहाने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाली, ” लोकांना सोशल डिस्टेंसिंगची कल्पना ठाऊकच नाही, कृपा करुन मास्क वापरा, सॅनिटाइझ करा, आणि सामाजिक अंतर राखा. आम्हाला हे अजून किती वेळा सांगावं लागेल. तुमच्या फाय़द्यासाठी आणि आमच्या फायद्यासाठी” नेहाने शेअर केलेला एअरपोर्टवरील फोटो पाहता लोकांना करोनाची चिंता नसल्याचं चित्र दिसत आहेत. नागरिकांनी कोणतिही शिस्त न पाळता गर्दी केल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.

गेल्या 24 तासात रुग्ण संख्येत मोठी वाढ
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. तसचं अनेक सेलिब्रिटी चाहत्यांना सतत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. यातच देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.