गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीशी नेहाचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या होत्या. त्यानंतर नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट टाकली आहे. ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडणं किती वेदनादायी असतं, हे तिने या पोस्टमधून सांगितलं आहे.

एकापाठोपाठ एक पोस्ट केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये नेहाने लिहिलं, ‘सेलिब्रिटी कितीही दुःखात असले तरीही त्यांना आपलं दुःख लपवून चेहऱ्यावर हसू आणावंच लागतं. मी सर्वस्व दिलं पण मला काय मिळालं हे मी सांगूही शकत नाही. लोक आता माझ्याबद्दल चर्चा करतील, माझ्याबद्दल बरंच काही बोलतील. जे मी केलं नाही त्याबद्दलही बोलतील. पण ठीक आहे. मला आता या सर्व गोष्टी ऐकण्याची आणि सहन करण्याची सवय झाली आहे. ‘

‘या जगात इतके वाईट लोकही आहेत हे मला माहीत नव्हतं. एका सेलिब्रिटीला पर्सनल आणि प्रोफेशनल असे दोन चेहरे असतात. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही कोणत्याही समस्यांना तोंड देत असलात तरी प्रोफेशनल लाइफमध्ये आम्हाला नेहमीच हसतमुख राहावं लागतं,’ अशा शब्दांत तिने आपलं दु:ख व्यक्त केलं.

नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १०’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. हिमांशसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने या सेटवर हजेरी लावत तिला सरप्राइज दिलं होतं. त्यावेळी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र आता ब्रेकअपनंतर नेहाला शूटिंग करणंदेखील अवघड होतं आहे. बऱ्याचदा तिला सेटवरही रडू कोसळलं. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप हिमांशने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.