रिंकु राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रिंकू पूर्वी ही भूमिका साकारत आहे. तर चिन्मयने नील ही व्यक्तीरेखा साकारली आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून, ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं लोकप्रिय गायिका नेहा कक्करने गायलं आहे. इतकंच नाही तर हे गाणं चित्रपटाच्या टीमसोबतच नेहासाठीदेखील खास आहे.

नेहा कक्करचं ‘मिले हो तुम हमको’ या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळविली होती. याच गाण्याचं मराठी व्हर्जन म्हणजे ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ गाणं आहे. आतापर्यंत अनेक हिंदी गाण्यांचं मराठीत रुपांतर करण्यात आलं असून हे त्यातलं नवीन गाणं आहे. नेहाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली असून तिचा हा व्हिडीओ रिंकूनेदेखील इन्स्टावरुन  शेअर केला आहे. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या फिमेल व्हर्जनला नेहा कक्कर हिने आवाज दिला असून मेल व्हर्जन स्वप्नील बांदोडकरने गायले आहे. नेहाचे मराठीतील हे पहिलेच गाणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

“मिले हो तुम हमको’ हे गाणे माझ्यासाठी सर्वात जवळचे गाणे आहे. माझ्या भावाने म्हणजे टोनी कक्करने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. कदाचित म्हणूनच या गाण्याचे मराठी व्हर्जन ‘मेकअप’ या चित्रपटात करण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतल्या या गाण्याला माझाच आवाज असल्याने मी खूपच आनंदित आहे. माझी मातृभाषा हिंदी आणि पंजाबी असल्याने हे गाणे मराठीत गाण्यासाठी मला खूप कठीण वाटत होते, मात्र या मराठी गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आणि आमच्या दिग्दर्शकांनी मला खूपच मदत केली”, असं नेहाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “मी आतापर्यंत एकच मराठी चित्रपट पहिला आहे आणि तो म्हणजे ‘सैराट’…. रिंकू राजगुरूचाच. योगायोगाने आज या गाण्याच्या निमित्ताने मी तिच्यासाठीच पार्श्वगायन करत आहे. माझ्याकडून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.”
बऱ्याचदा चित्रपटांमध्ये गाण्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. चित्रपटात कलाकार नेहमीच त्यांच्या भावना गाण्यातून व्यक्त करतात. मिले हो तुम हमको’ गाण्यातून प्रेमात येणारे चढउतार आणि त्यातून होणारे मतभेदावर भाष्य करण्यात आलं आहे.


सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. सुजॉय रॉय यांची कथा असलेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत