भुवनेश्वर येथे झालेल्या गोल्डन ट्रँगल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री नेहा महाजन ही ‘गांव’ या हिंदी चित्रपटातील भूमिके साठी सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची मानकरी ठरली. नेहाच्या यशाने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या महोत्सवामध्ये १७ देशांतील ५६ चित्रपटांचा सहभाग होता. नेहा महाजन ही प्रसिद्ध सतारवादक विदुर महाजन यांची कन्या आहे.

‘बेवक्त बारीश’ या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून नेहाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘निळकंठ मास्तर’, ‘आजोबा’, ‘वन वे तिकिट ’ या  चित्रपटांतून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटासाठी त्यांना सवरेत्कृष्ट युवा अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर दीपा मेहता यांच्या ‘मिडनाईट चिल्ड्रन’ या चित्रपटातून नेहाने आंतरराष्ट्रीय चित्रपटात पदार्पण केले. ‘गांव’ या चित्रपटात तिने गावाचा कायापालट करणारी अशी मुख्य व्यक्तिरेखा साकारली.  झपाटय़ाने होत असलेल्या शहरीकरणात गावपण कसं हरवत चालले आहे यावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो.

या भूमिकेबद्दल नेहा म्हणाली, ‘ गांव’ चित्रपटाचे झारखंड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या एका छोटय़ाशा गावात चित्रीकरण झाले. या चित्रपटात मला सतार वादन करण्याची संधी मिळाली. ‘अल जजिरा’ या न्यूज नेटवर्कसाठी माहितीपटाची निर्मिती करणारे गौतम सिंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. लवकरच हा चित्रपट मॉस्को आणि अन्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार आहे.’