गेल्या काही दिवसात अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतं आहेत. यात आता आणखी एका मराठी सिनेमाची भर पडली आहे. तो म्हणजे ‘जून’ हा सिनेमा.

मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी आपल्या आगामी वेबसिरीज आणि वेबफिल्मची घोषणा करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता ‘प्लॅनेट मराठी’चा नवा आणि पहिलावहिला ‘जून’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केलं आहे. निखिल महाजन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून ‘जून’ला जितेंद्र जोशी यांचं गीत लाभलं आहे. तर गायिका शाल्मली खोलगडे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच संगीतकाराची भूमिका बजावत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

५१ व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया)मधल्या इंडियन पॅनोरोमा या विभागात ‘जून’ चित्रपटाची निवड झाली होती. यासोबतच पुणे फ़िल्म फ़ेस्टिवल, केरळ फिल्म फेस्टिवल आणि आता न्यूय़ॉर्क फ़िल्म फेस्टिवलमध्ये जूनची निवड झाली आहे. यात सर्वोत्तम अभिनयाच्या पुरस्कार नामांकनामध्ये नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन यांची निवड झाली आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जून’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘जून’च्या निमित्ताने निखिल महाजन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

”निखिल महाजन सारख्या तरुण दिग्दर्शकाचे लेखन, वैभव आणि सुहृद यांचे दिग्दर्शन असलेला ‘जून’ हा चित्रपट आम्ही ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत याचा आनंद आहे. मानवी स्वभावातील विविध कंगोरे ‘जून’मध्ये उलगडले गेले आहेत. नील आणि नेहा’ यांच्या संवेदनशील नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांनाही नक्की आवडेल.” असा विश्वास प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केला आहे.

आजपासून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जूनचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येईल. तसेच ‘प्लॅनेट मराठी’च्या लाँचनंतर वेबसाईट आणि ॲपवर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.