19 March 2019

News Flash

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना बिग बींना पडला ‘तिचा’ विसर

नेटकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडिमार

अमिताभ बच्चन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला वर्गाला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी जया बच्चन यांच्यासोबतच आपल्या मुली आणि नातींचे फोटो पोस्ट केले. पण, तरीही हा फोटो काही अपूर्णच वाटत होता.

महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बिग बींनी केलेलं हे ट्विट पाहून नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी व्यक्त होण्यासही सुरुवात केली. पण, यावेळी मात्र बिग बींवर चाहत्यांनी नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ऐश्वर्याचा फोटो का नाही, हाच प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी बिग बींना पेचात पाडलं. नेहमीच आपल्या कुटुंबातील महिलांविषयी अभिमानाने बोलणाऱ्या या महानायकाला नेमका ऐश्वर्याचा विसर पडलाच कसा, असं म्हणत अनेकांनी आपले तर्क लावण्यासही सुरुवात केली.

एकामागोमाग एक ट्विट करत अनेकांनीच अमिताभ बच्चन यांच्यासमोर प्रश्नांचा डोंगर उभा केला. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया आणि त्यांचं निरिक्षण पाहता सेलिब्रिटींच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर त्यांची बारीक नजर असते हेच स्पष्ट होत आहे. तेव्हा आता चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणून बिग बी ऐश्वर्याचा फोटो पोस्ट करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Women’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट

First Published on March 8, 2018 2:15 pm

Web Title: neitzens cannot understand why daughter in law actress aishwarya rai is missing from amitabh bachchans post on international womens day