07 August 2020

News Flash

आतले आणि बाहेरचे!

बॉलीवूडच्या आतले आणि बाहेरचे या चावून चावून चोथा झालेल्या मुद्दय़ावर येऊन अडकला आहे.

रेश्मा राईकवार

वपुंच्या ‘आतले आणि बाहेरचे’ची तीव्रतेने प्रचीती सध्या बॉलीवूड नामक मायानगरीत झडलेल्या वादविवादावरून येते आहे. लोकलच्या डब्यात थोडी का होईना जागा आहे म्हणून बाहेरून आत घुसू पाहणारी गर्दी आणि आत जागा कु ठे आहे, आम्हीच कसेबसे उभे आहोत म्हणत संघटित होऊन बाहेरच्या गर्दीला थोपवू पाहणारी आतली गर्दी.. हा संघर्ष थोडय़ाफार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात सुरूच असतो. मात्र या दोन्हींपैकी कोणीही मागे हटले नाही तर काय?..

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येमुळे सुरू झालेल्या वादविवादाचा धागा आता दोरखंडाएवढा मोठा झाला आहे आणि याचा फास बॉलीवूडमधल्या भल्याभल्या जाणत्यानेणत्या मंडळींना बसतो आहे. हा वाद सुशांतवर प्रस्थापितांकडून कसा अन्याय झाला आहे, इथपासून सुरू झाला होता आता तो घराणेशाही, अन्याय-अत्याचार अशी वळणे वळणे घेत बॉलीवूडच्या आतले आणि बाहेरचे या चावून चावून चोथा झालेल्या मुद्दय़ावर येऊन अडकला आहे. या वादाला खरं म्हणजे नेहमीप्रमाणे अभिनेत्री कंगना राणावतने सुरुवात केली आहे किंबहुना कंगनाच हा वाद पुढे नेते आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुशांतला बॉलीवूडच्या प्रस्थापितांकडून मिळालेली हीन वागणूक, त्याच्या चित्रपटांवर झालेला अन्याय, सततच्या अपयशामुळे त्याच्याकडून काढून घेतलेले चांगले चित्रपट या सगळ्यातून आलेल्या नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केली. आपल्यावरही हीच वेळ आली होती, पण आपण या सगळ्याला पुरून उरलो, असा दावा कं गनाकडून सातत्याने के ला जातो आहे. मात्र कंगनाने मांडलेला हा मुद्दा सुशांत आणि तिच्यावर झालेल्या अन्यायापुरताच सीमित राहिला नाही. तर यात अनेक व्यक्ती कधी विनाकारण तर कधी सकारण ओढल्या गेल्या आणि या वादाला फाटे फु टत राहिले. सध्या कंगनाची बाजू आणि तिने घेतलेली भूमिका पटणारे आणि कंगनाचे वागणे अजिबात न पटलेले असे दोन सरळ सरळ तट पडले आहेत. दोन्हीकडे काही प्रमाणात तथ्य आहे असे मानणाराही एक वर्ग आहे, मात्र एकतर आहे रे म्हणा किं वा नाही रे म्हणा.. हा जोर एवढा आहे की या तिसऱ्या वर्गाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

घराणेशाहीतहीे..

स्टार किड्सना मिळणारे प्राधान्य आणि त्यांना लाँच करण्यासाठी कायम उत्सुक असलेली करण जोहर, सलमान खानसारखी मंडळी यांच्यावर कंगनाने जोरदार टीका केली. करण जोहरच्या शोमध्ये अलिया भट्टने कोण सुशांत?, म्हणून केलेली त्याची अवहेलना ते सुशांतसारख्या गुणवान कलाकारापेक्षा सारा अली खान, अनन्या पांडे अशा स्टार किड्सना सहज मिळणारे चित्रपट.. याबद्दलही चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा इथेच थांबली नाही, तर एकेकाळी ज्या भट्ट कॅम्पच्या चित्रपटांच्या मदतीने कंगना बॉलीवूडमध्ये स्थिरावली त्यांच्यावरही कंगनाने टीका केली. महेश भट्ट यांनी आपल्याला चप्पल फेकून मारली होती, असा किस्साही कंगनाने सांगितला. हा मुद्दा पूजा भट्टला रुचला नाही आणि तिने कंगनाचाच महेश भट्ट यांचे कौतुक करणारा जुना व्हिडीओ टाकू न ‘व्हिडीओही खोटं बोलतात..’ अशी टिप्पणी के ली. पण याचबरोबर पूजाने आणखीही काही गोष्टींवर प्रकाश टाकला. नामांकित बॉलीवूडमंडळींची मुलं असूनही इंडस्ट्रीत अनेकांवर एक वेळ अशी आली आहे जेव्हा त्यांना बाहेरच्यांसारखंच वागवलं गेलं आहे. आणि कधीकाळी बाहेरून आलेली मंडळी आज प्रस्थापितांच्या यादीत असण्याइतकी आतली झाली आहेत. हाच मुद्दा सुशांतच्या निधनानंतर अभिनेता सैफ अली खान यानेही अनेक वेळा मांडला. अनेक स्टारपुत्रांची कारकीर्द इंडस्ट्रीतील हिट-फ्लॉपच्या समीकरणाने संपवल्याचे सैफने म्हटले आहे. आणि हेच समीकरण एकप्रकारे इंडस्ट्रीत आतला असूनही उपऱ्याचा अनुभव देण्यास कारणीभूत ठरल्याचे अभिनेता कुणाल खेमूने म्हटले आहे. ‘डिस्ने – हॉटस्टार’ वाहिनीने आपल्या आगामी सात चित्रपटांची घोषणा करण्यासाठी आयोजित के लेल्या पत्रकार परिषदेत अजय देवगण, अक्षय कुमार, अलिया भट्ट, अभिषेक बच्चन आणि सूत्रसंचालक म्हणून वरुण धवन यांना बोलावले होते. मात्र याच यादीत विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ आणि कु णाल खेमूचा ‘लूटकेस’ असे दोन चित्रपट होते, पण या दोघांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले नाही. या प्रकाराने आधीच तापलेल्या घराणेशाहीच्या वादाला आणखी तडका दिला..

चांगले कलाकार आहेत कु ठे?

घराणेशाहीच्या या वादात अनेकांनी आपल्याकडून नको ती भर टाकली आहे. दिग्दर्शक आर. बाल्की यांनी ट्विटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये सतत घराणेशाही आणि प्रस्थापितांविरोधात बोलले जाते, पण सध्या अलिया, रणबीर यांच्यापेक्षा चांगले कलाकार आहेत कु ठे?, असा प्रश्न उपस्थित के ला होता. अर्थात, त्यांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून चांगल्या कलाकारांची भलीमोठी यादी शेखर कपूर यांच्यापासून अनेक कलाकार-दिग्दर्शकांनी बाल्कींपर्यंत पोहोचवली.

तथाकथित बाहेरच्यांमध्येही वाद..

कंगना राणावत वादाची सुरुवात करते तेव्हा तिच्याबरोबर इतर कलाकारही यात नकळतपणे ओढले जातात. अभिनेता तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्याबाबतीत तेच घडले. तापसी आणि स्वरा या दोघीही बाहेरून इंडस्ट्रीत आलेल्या आहेत. पण बॉलीवूडमधील प्रस्थापितांच्या यादीत चांगली जागा मिळवणं ही त्यांची गरज असल्याने त्या दोघी करण जोहरसारख्यांची स्तुती करत असतात, असा दावा कंगनाने केला. एवढं करूनही त्या बाहेरच्याच असल्याने आजवर बी ग्रेड अभिनेत्रीच राहिल्या आहेत, असं प्रमाणपत्रही कंगनानेच देऊन टाकलं. त्यामुळे बिथरलेल्या तापसीने आता इंडस्ट्रीत दर्जाही ठरवला जाऊ लागला आहे का? आत्तापर्यंत तर नंबरचीच स्पर्धा होती ना.. असा टोला कंगनाला लगावला. स्वत:च्या फायद्यासाठी कोणाच्या तरी आत्महत्येचा आधार घेऊन बखेडा उभं करणं मला मान्य नाही. एक कलाकार म्हणून जेव्हा मला न सांगता ‘पती पत्नी और वो’ चित्रपटात माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं गेलं तेव्हा मी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला होता. योग्य पद्धतीने आपण न्याय मिळवण्यासाठी भांडलं पाहिजे, असं सांगतानाच केवळ आपली बाजू घेतली नाही म्हणून दुसऱ्या कलाकारांवर वाटेल तशी टीका करणाऱ्या कंगनाबद्दल मात्र तिने जाहीर नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री स्वरानेही कंगनाचाच ‘इंडस्ट्रीत आतले-बाहेरचे असं काही नाही. प्रेक्षकच कलाकारांना लोकप्रियता मिळवून देतात’, असे विधान असलेला व्हीडिओ व्हायरल केला. मात्र अशा प्रकारे जुना व्हिडीओ टाकून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका कंगनाच्या पीआर टीमने समाजमाध्यमांवरून के ली.

काही निर्थक वाद..

कोणीतरी सुरू केलेल्या या घराणेशाही आणि आतले-बाहेरचे या वादाने याच्याशी संबंध नसलेल्या इतर लोकांमध्येही द्वेषाची बीजे पेरली आहेत. एकेकाळी या व्यवस्थेला चोवीस तास दोष देणारी माणसं आज प्रस्थापितांची प्रचारक बनून फिरत आहेत, अशा आशयाची पोस्ट अभिनेता रणवीर शौरीने टाकली होती. ही पोस्ट आपल्यासाठीच आहे असे समजून दिग्दर्शक अनुरागने रणवीरला बोलतं करत नवीन वाद ओढवून घेतला. एके काळी आपली चांगली मैत्रीण असलेली कंगना आता ज्या पद्धतीने वागते आहे ते अनाकलनीय आहे, अशी भूमिका घेणारा अनुराग सध्या कंगनाची टीम आणि चाहत्यांकडूनही टीकेचा धनी झाला आहे.

या सगळ्या आतले आणि बाहेरचे या वादात न पडता बॉलीवूडमधली प्रस्थापित आणि बाहेरून आत आलेलीही अनेक चतुर मंडळी काहीही न बोलता शांतपणे करोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीचा स्वीकार करत आपले चित्रपट करण्यात मग्न आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासातून नेमकं  काय सत्य बाहेर येईल, याची अद्यापही कोणाला कल्पना नाही. मात्र त्यामुळे रंगलेला हा आतले आणि बाहेरचे हा वाद आणखी काही कलाकारांचे खरे चेहरे उघड करता झाला तर नवल नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 3:11 am

Web Title: nepotism in bollywood nepotism debate in bollywood zws 70
Next Stories
1 मालिकांची कथा मूळ पदावर
2 ‘फेक फॉलोअर्स’ जाहिरातींसाठी केविलवाणी धडपड
3 प्रेक्षकांच्या कानी ताऱ्यांचे सूर..
Just Now!
X