|| पंकज भोसले

भारतीय मनोरंजन उद्योगात ‘नेटफ्लिक्स’ या घटकाची पाळण्यातील पावले लवकरच वेगात धावताना दिसणार आहेत. तीन आठवडय़ांपूर्वी ‘लस्ट स्टोरीज’ नामक सिनेचौकटीतून देशातील खळबळीत स्त्री-सत्य मांडून आणि परवाचभारतातील आपली पहिली मालिका गुंतवणूक ‘सेक्रेड गेम’द्वारे करून या मनोरंजन घटकाने आपला पाया भारतीय प्रेक्षकांच्या मनात रोवला आहे. ऑनलाइन स्ट्रिमिंगवर चालणाऱ्या या उद्योगाच्या यशस्वीतेबाबत शंका घेणाऱ्यांना चपराक लगावत नेटफ्लिक्स जगाला मनोरंजन दर्शकांची एकच एक वसाहत बनवू पाहतेय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यापेक्षाही अधिक जग आपल्या अधिपत्याखाली घेण्यासाठी सज्ज असलेली नेटफ्लिक्स सध्या हॉलीवूडच्या बडय़ा स्टुडिओंना एकत्र करूनही होणार नाही इतके सिनेमे, मालिका यांच्या निर्मितीमध्ये शिरली आहे. हा घटक कोणत्याही भाषांमधील सिनेमा, मालिकांमधील उत्कृष्ट ते सर्वच जगभरच्या प्रेक्षकांनी पाहावे यासाठी सज्ज झाला आहे.

हाऊस ऑफ कार्ड्स, थर्टीन रिझन्स व्हाय यांच्यासोबत टॅब्युला रसा, मनी हाईस्ट, नार्को यांच्यासारख्या इंग्रजी आणि परभाषिक मालिका आणि डझनाहून आडदेशांच्या सिनेमांना जगभरात लोकप्रिय बनविणाऱ्या नेटफ्लिक्सवर गेल्याच आठवडय़ात इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने ‘कव्हरस्टोरी’ केली. अन् त्यात या बलाढय़ अर्थव्यवहारक्षम उद्योगाचा धांडोळा घेतला. भारतामध्ये टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे दररोज दीड जीबीहून अधिक डाटा खर्च करणारे ग्राहक वाढत चालले आहेत. या स्वस्तोत्तम नेटसुविधेत घोडदौड करणाऱ्या नेटफ्लिक्समुळे साऱ्याच खंडांतील सिनेमांची उपलब्धी साऱ्याच खंडांमधील प्रेक्षकांना मिळत आहे. उत्तम-नेत्रदीपक, मनोरंजक आणि बुद्धीवाहक सिनेमांच्या या रतिबाला डोळेभरून पाहण्यासाठी वेळ कमी पडण्याची स्थिती सध्या प्रत्येकाला भेडसावतेय.

नेटफ्लिक्सच्या देशोदेशीच्या सिनेखोदकामातूनच गेल्या आठवडय़ात स्कॉटलंडचा ‘कॅलिबर’ हा सिनेमा सध्या सिनेशोधकांच्या वर्तुळात गाजतोय. एरव्ही मुख्य धारेतील प्रवाहात आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा शिक्का बसल्यानंतरच उमजण्याची संधी असलेला हा चित्रपट या वितरण प्रणालीमुळे पाहणे शक्य झाले आहे. एरव्हीही ब्रिटिश, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील इंग्रजी सिनेमा अमेरिकेत गाजून झाल्यावरच आपल्यापर्यंत पोहोचतो. आता त्यात मोठा बदल झाला आहे. पुढील काळात तो आणखी जाणवणार आहे.

स्कॉटलंडविषयीचे गेले दोन दशके सर्वाधिक गाजलेले सिनेमे आहेत ते डॅनी बॉएलचे शॅलो ग्रेव्हपासून ट्रेनस्पॉटिंगपर्यंतचे इरसाल नमुने. आयर्विन वेल्शच्या कादंबऱ्यांतून  कोकणातील तऱ्हेवाईक व्यक्तिरेखांसमान या देशातील अनेक लोक डोकावलेत आणि त्यांच्यावरील सिनेमांतून ते सर्वदूर पोहोचलेत. कॅलिबरमध्ये इरसाल व्यक्तिरेखा नाहीत, पण एका छोटय़ाशा गावातील आर्थिकदृष्टय़ा उभरण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या व्यक्तींचा समूह आहे.

कॅलिबरमध्ये गोष्ट आहे दोन मित्रांच्या शिकारीच्या हौसेतून घडत जाणाऱ्या दुर्घटनांची. वॉन (जॅक लोडन) मार्कस (मार्टनि मॅक्केन) हे दोघेहे बोर्डिग स्कूलपासून एकत्र असलेले मित्र. खुशालचेंडू मार्कस बडय़ा कंपनीमध्ये गुंतवणूक सल्लागारपदी असतो. वॉनने नुकतेच कुटुंब थाटल्याने मैत्री आता कुठल्याशा सुट्टीपुरती मर्यादित असते. अशाच एका सुट्टीत एडिनबर्गवरून दूर असलेल्या शहरगावात ते दाखल होतात. हेतू जवळच असलेल्या जंगलात कायदेशीर शिकारीचा आनंद घेण्याचा. शहरगावाची अर्थव्यवस्थाच पर्यटन आणि शिकाऱ्यांना आश्रयस्थान देण्यातून अवलंबून असल्याने त्यांची योग्य ती सरबराई होते. गावातील सरपंचाचा दर्जा असलेल्या लोगन (टोनी करेन) याच्याकडून त्यांना स्थानिक मद्यालयात शिकारीचे सल्लेही मिळतात.

रात्रभर खूप मद्यमौज करून मार्कस आणि वॉन सकाळी जंगलात दाखल होतात. तिथे लवकरच त्यांना आपल्या शिकारीचे दर्शन होते, मात्र वॉनच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे सावजाऐवजी अपघाताने जंगलात फिरायला आलेल्या एका लहान मुलाचा मृत्यू होतो. या घटनेला दडपण्यासाठी मार्कसच्या हातून मुलासोबत आलेल्या व्यक्तीचा खून होतो. शिकारीची हौस हत्यांमध्ये बदलल्याने पापभीरू वॉन आणि रांगडय़ा मनाचा मार्कस सुरुवातीला भेदरून जातात. मग मार्कस वॉनच्या मर्जीविरोधात दोन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची योजना आखतो.

दोन व्यक्ती जंगलातून न परतल्याने त्या छोटय़ाशा शहरगावात खळबळ माजते. वेगवेगळ्या कारणांनी या दोन्ही मित्रांना गावात अडकून पडावे लागते. सर्वापासून दुर्घटना लपविण्याच्या नादात गोष्टी उलट फिरायला लागतात आणि मार्कस आणि वॉन अधिकाधिक अडकायला लागतात.

दिग्दर्शक मॅट पामर याने खूप भव्य-दिव्य गोष्टी न दाखविताही उत्तम थरारपट तयार केला आहे. संपूर्ण सिनेमात गडद वातावरण आहे. शहरगावाजवळील किर्र जंगल, गावातील थोडक्याच शांत लोकांचा एकमेकांना जपणारा समूह. त्यांचे दैनंदिन जगणे आणि सोहळ्यातील वावरणे, यांना तपशिलात चित्रपटात स्थान आहे. वॉन आणि मार्कसमध्ये दुर्घटनेपासून पळ काढण्यासाठीच्या मनसंघर्षांला आणि आधीच डबघाईला आलेल्या गावाची या परिस्थितीला सामोरे जाताना भविष्यातील आर्थिक प्रश्नांच्या भीतीला उत्तमरीत्या दाखविले आहे.

कॅलिबरसारख्या सिनेमांना किंवा एकूणच स्कॉटलंडच्या सिनेमाला आपल्याकडचा प्रेक्षक सरावलेला नाही. कलात्मक आणि व्यावसायिक या दोन्हींच्या सीमारेषेवरून शिकारीची मनथरारक गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचा अनुभव वेळ वाया गेल्याचे दु:ख देत नाही. वेळसंपन्न नेटफ्लिक्स युगात सिनेज्ञान श्रीमंतीकडे आपली वाटचाल सुरू आहे, ही मनोरंजनासाठी चांगलीच गोष्ट आहे.