डिजीटल माध्यमाचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे आणि ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राइम’ यांसारख्या प्लॅटफॉर्म्सची मागणीसुद्धा दिवसागणिक वाढत आहे. डिजीटल विश्वातील प्रेक्षकांची वाढती संख्या लक्षात घेऊन बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सवर तिचा चित्रपट घेऊन येत आहे. ‘फायरब्रँड’नंतर हा नेटफ्लिकचा दुसरा ओरिजिनल मराठी चित्रपट आहे. ‘१५ ऑगस्ट’ असं चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटात एका चाळीत राहणाऱ्या सामान्यांची कथा दाखवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी चाळीत सुरू असलेली तयारी, त्यातच आपल्या प्रेमाला मिळवताना एका तरुणासमोर उभ्या असलेल्या समस्या आणि त्याला यातून बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे चाळीतले लोक एकत्र येतात, हे एका दिवसाच्या कथेतून अधोरेखित करण्यात आले आहे. यामध्ये स्वप्ननील जयकर, राहुल पेठे, मृण्मयी देशपांडे, वैभव मांगले, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

माधुरी दीक्षित नेने आणि तिचे पती श्रीराम नेने मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २९ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.