करोना विषाणूमुळे देशभरातील लोक त्रस्त आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी देशातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. लाखो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नेटफ्लिक्सने मदतीचा हात पुढे केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सने रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी तब्बल सात कोटी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मनोरंजनक्षेत्र पूर्णपणे थांबलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कुठलाही नवा चित्रपट, मालिका, नाटक काहीच प्रदर्शित झालेलं नाही. किंबहूना सुरु असलेलं चित्रीकरण देखील थांबलं आहे. त्यामुळे कलाकारांसोबतच या क्षेत्रातील लहानमोठी कामं करणारा कर्मचारी वर्गही हैराण झाला आहे. पेंटर, लाईटमन, कारपेंटर, स्पॉटबॉय, सफाई कर्मचारी अशा मंडळींना रोजंदारीवर काम मिळतं. मी मंडळी लॉकडाउनमुळे घरात बसली आहेत. त्यामुळे आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मंडळींसाठी आता नेटफ्लिक्स पुढे सरसावलं आहे. त्यांनी तब्बल सात कोटी ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.

नेटफ्लिक्स एक ऑनलाईन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’, ‘सिलेक्शन डे’, ‘स्ट्रेंजर थिग्स’, ‘लिटिल थिंग्स’ अशा वेब सीरिज आणि चित्रपट पाहू शकता. या ऑनलाईन मनोरंजनासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागतो. नेटफ्लिक्स हे आज भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑनलाईन अ‍ॅपपैकी एक आहे.