करोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांचं कमी जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे, होत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही या महामारीचा फटका बसल्याचं वृत्त आता समोर येत आहे. २०२१ या वर्षात प्रदर्शनासाठी आता नेटफ्लिक्सकडे नव्या सीरीज, चित्रपटांची कमतरता निर्माण झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विकासासंदर्भात काम करणाऱ्या एका वेबसाईटवरून ही माहिती मिळत आहे.

इंडिया टुडेने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमांची संख्या १२ टक्क्यांनी घसरली आहे. या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, जानेवारी ते एप्रिल २०२१ या काळात नेटफ्लिक्सकडे १५९ कार्यक्रम आहेत. तर गेल्या वर्षी हीच संख्या १८० इतकी होती. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या कार्यक्रमांची संख्या १२ टक्क्यांनी घसरली आहे. ही टक्केवारी कमी वाटत असली तरी नेटफ्लिक्सची दरवर्षीची आकडेवारी पाहता ही घसरण नोंद घेण्याइतपत असल्याचं मत या वेबसाईटसाठी लिहिणाऱ्या कॅसी मुरे यांनी व्यक्त केलं आहे.

हा डेटा अमेरिकी मार्केटपुरता मर्यादित असल्याचं मुरे यांनी सांगितलं आहे. नेटफ्लिक्स आपल्या सीरीज आणि चित्रपटांचं चित्रीकरण एक महिना आधीच करतं, त्यामुळे त्यांना २०२०मध्ये केवळ शीर्षक जाहीर करताना काही समस्या वाटली नाही. नेटफ्लिक्सकडून त्यांच्या सीरीजचे सर्व भागही एकाच प्रदर्शित केले जातात.

सध्या करोना संबंधित निर्बंधांमुळे चित्रीकरण तसंच प्रॉडक्शन करण्याला फार मर्यादा आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासावरही निर्बंध असल्याने कार्यक्रमांच्या निर्मितीवर अनेक बंधने आली आहेत. हे होणार असल्याचा अंदाज आपल्याला होता असं नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आलं. ही परिस्थिती कधीपर्यंत अशीच राहील, कधी हे सर्व निर्बंध, बंधने उठवण्यात येतील हे कोणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा हे होईल तेव्हा आम्ही सर्व कामाला सुरुवात करु असंही या कंपनीकडून सांगण्यात आलं.

२०२०च्या पूर्वार्धात नेटफ्लिक्सने १५.८ मिलीयन पेड सबस्क्राईबर्सचा आकडा गाठला होता. युजर्सना इतरांसोबत आपल्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा पासवर्ड शेअर करता येऊ नये यावर सध्या काम करत असल्याचं नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आलं आहे.