|| स्वाती केतकर पंडित

सध्या नेटफ्लिक्सवर ‘सर’ हा सिनेमा गाजतो आहे आणि त्यातले कलाकारही. मोजून दोन मुख्य भूमिका. टोलेजंग इमारतीत राहणारा उच्चभ्रू तरुण अश्विन आणि त्याच्या घरातील स्वयंपाकपाणी, साफसफाई सगळं सांभाळणारी मदतनीस म्हणून काम करणारी रत्ना. या दोघांमध्ये निर्माण होणारे तरल भावबंध टिपणारा हा सिनेमा. विवेक गोम्बर आणि तिलोत्तमा शोम या दोघांनी या भूमिका के ल्या आहेत. अतिशय शांत, संयत अशा अश्विनची भूमिका करणारा विवेक सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच गाजतो आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता म्हणून विवेक आपल्याला माहिती आहे. ‘सर’च्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा…

 सिनेमहोत्सवांतून ‘सर’ या सिनेमाचं जोरदार कौतुक झालं आणि आता समाजमाध्यमांतूनही सिनेमाबद्दल बरंच काही सकारात्मक बोललं जातं आहे. तुझ्या भूमिकेचंही कौतुक होतं आहे. तुझा महिला चाहता वर्ग विशेष वाढतो आहे…

ही अशा प्रकारची प्रसिद्धी, लोकांचं प्रेम कदाचित मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. याआधीही मी भूमिका के ल्या, पण हिरो टाइप भूमिका म्हणायची तर ही पहिलीच. मी समाजमाध्यमांवर फारसा नसतो, पण माझी सहकलाकार तिलोत्तमा आणि आमची दिग्दर्शक रोहेना गेरा या दोघी मला या माध्यमाची जाणीव करून देत असतात. लोकांचं तुझ्यावरचं प्रेम वाढतंय, असं सांगत असतात. त्यामुळे अर्थातच आनंद वाटतो आहे. प्रेक्षकांचं हे अशाप्रकारचं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

  ही भूमिका तुझ्याकडे कशी आली?

रोहेनाने जेव्हा सिनेमाची कथा लिहिली त्यानंतर तिचं एक नक्की होतं की रत्नाची मुख्य भूमिका तिलोत्तमाच करेल.  त्यामुळे ते अश्विनचाच शोध घेत होते. रोहेनाने माझी ‘कोर्ट’मधली भूमिका बहुतेक पाहिली होती. त्यामुळे त्यांनी मला ऑडिशनला बोलावलं. आणि रीतसर दोन-दोन वेळा ऑडिशन घेऊन माझी निवड झाली. हा सिनेमा म्हणजे खरंतर सबकुछ रोहेना आहे. तिनेच कथाही लिहिली आहे, दिग्दर्शित केली आहे आणि निर्मितीतही तिचाच मोठा वाटा आहे. मी जो काही अश्विन उभा करू शकलो आहे, त्यामागे तिचाच मोठा हात आहे. कधीकधी मला वाटायचं, एखादा संवाद अधिकचा घ्यावा का, एखादी जास्तीची जागा काढावी का प्रसंगातून… पण रोहेनाचं म्हणणं ठाम होतं. तिला जे काही मांडायचं होतं ते तिने नेमक्या शब्दांत लिहून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही त्यात ढवळाढवळ करणार नव्हतोच. तिच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत गेलो आणि ते करता करताच अश्विन सापडत गेला.

आधी ‘कोर्ट’, मग ‘सुटेबल बॉय’ आणि आता ‘सर…’ मसाला फिल्मच्या पलीकडच्या अशा थोड्या वेगळ्या फिल्म्स तू कायम करत आला आहेस. तू मुद्दाम असे प्रोजेक्ट निवडलेस की जे आलं ते स्वीकारलंस?

– दोन्ही असं म्हणेन मी. कारण खरंतर अभिनेता सिनेमा निवडत नसतो तर सिनेमा अभिनेत्याला निवडतो, असं म्हटलं जातं. जे या सिनेविश्वात खरंही असतं. पण मला वाटतं अभिनेत्यानेही आपण नेमकं  काय करत आहोत, त्याची जबाबदारी उचलणं भाग आहे. मी तशी घेण्याचा प्रयत्न करतो. तरीही वेगळ्या धाटणीचा, के वळ मसाला नसलेला असा सिनेमा मी काही ठरवून के ला नाही. उद्या मला मसाला सिनेमासाठी विचारणा झाली तर तोही कदाचित करेन. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, दिग्दर्शकाचं सिनेमाशी असलेलं इमान. मीरा नायर यांचं ‘द सुटेबल बॉय’ या कादंबरीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांना कधीपासून यावर सिनेमा बनवायचा होता. त्यामुळे त्या त्यावर काम करत होत्या. ‘कोर्ट’ हे चैतन्यचं स्वप्नच होतं. त्याने खरोखरच आयुष्याची काही वर्ष त्यावर घालवली आणि आता ‘सर’… रोहेनासाठी कायमच हा सिनेमा खास होता. तिने कथा लिहिली. तो तयार होण्यासाठी प्रचंड वाट पाहिली. त्यावर खूप वेळ घालवून काम के लं. प्रत्येक दृश्याचा बारकाईने अभ्यास के ला. हे सगळं एक अभिनेता म्हणून मला नक्कीच आवडणारं आणि प्रेमात पाडणारं आहे. त्यामुळेच मी सिनेमा निवडताना (अर्थात जेव्हा संधी मिळते तेव्हा…)या गोष्टीचा नक्कीच विचार करतो. त्याचबरोबर माझ्यासह काम करणारी माणसं कोण आहेत, याचाही विचार मी आवर्जून करतो. कारण सगळ्या टीमसोबतच आपण काम करत असतो. अभिनेता एकटा येऊन काही त्याचं काम करून जात नाही. सगळी टीम तिथे असते. माझ्या सुदैवाने या प्रोजेक्टसह चांगली टीम, चांगले दिग्दर्शक, चांगली कथा आणि समीक्षक आणि प्रेक्षकांचं प्रेम हे जुळून आलं इतकंच.

 ‘कोर्ट’च्या निमित्ताने तू निर्माताही झालास आणि चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’ या पुढच्या सिनेमाची निर्मितीही तू के ली आहेस. एक अभिनेता आणि निर्माता या दोन गोष्टी करतानाचा समतोल कसा सांभाळतोस?

– मला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. मी अभिनयाचं शिक्षणही घेतलं आहे आणि गेली अनेक वर्ष इंग्रजी थिएटर करतो आहे. त्यामुळे जेव्हा मी अभिनेता असतो तेव्हा दिग्दर्शक हाच टीमचा कप्तान हे रंगभूमीचं, नाटकाचं तत्त्व मी पाळतो. त्याबरहुकू म वागतो, माझं सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो. खरंतर माझं काम तिथे सोपं असतं. निर्माता म्हणून मात्र मला दिग्दर्शकाचं कलास्वातंत्र्य मान्य करायचं असतंच, पण त्याचबरोबर आर्थिक व्यवहाराचं भानही राखावं लागतं. त्यामुळे निर्माता होणं माझ्यासाठी अधिक थकवणारं आहे.

एक अभिनेता म्हणून आणि एक निर्माता म्हणून ओटीटीचं माध्यम सोयीचं वाटतं की गैरसोयीचं?

– आत्ताच याबद्दल काही सांगता येणार नाही. करोना आला त्यामुळे चित्रपटगृहे एकदम बंद झाली. ओटीटीवरची प्रेक्षकसंख्या वाढली हे खरं आहे. पण चित्रपट माध्यमाला, दुनियेला हे नक्की फायद्याचंच होईल, प्रचंड फायद्याचंच होईल असं मात्र थेट म्हणता येणार नाही. कारण ती गणितं वेगळी असतात. ओटीटी स्वत:सुद्धा संक्रमणाच्या काळात आहे. त्यांनी प्रचंड आशय निर्माण के ला आहे, करत आहेत. निर्माता म्हणून मी ही सारी परिस्थिती समजून घेतो आहे. पण एक अभिनेता म्हणून मी नक्कीच खूश आहे. मला असंख्य प्रकारचे प्रोजेक्ट करायला मिळतील. एक आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. जे आजपर्यंत टीव्हीवरच मिळत होतं. आता कोणत्याही अभिनेत्याला एक तक्रार नक्कीच करता येणार नाही. ती म्हणजे, मेरा काम किसीने देखा ही नही. आता वेबमालिका आहेत, ओटीटीवरचे सिनेमे आहेत. थिएटर्समधले सिनेमे, नाटके, मालिका आहेत. मनोरंजनाचे आणि कला दाखवण्याचे अगणित पर्याय आहेत. त्यामुळे माझं काम कोणी पाहिलंच नाही, असं म्हणता येणार नाही. ही सारी माध्यमं एकत्र आल्याने एकाअर्थी मनोरंजनाचं महाद्वार खुलं झालं आहे. इथून विन्मुख जाणारा विरळाच.

एक निर्माता म्हणून माझ्यासमोर वेगळ्या अडचणी दिसतायेत. ओटीटीच्या स्पर्धेत अनेक मोठे स्पर्धक उतरतायेत. एकट्या निर्मात्याच्या तुलनेत या कंपन्यांची खर्च करण्याची क्षमता अर्थातच जास्त आहे. त्यामुळेच मग चित्रीकरणासाठी लागणारे कु शल तंत्रज्ञ, सहाय्यक मिळवणं हीसुद्धा एक मोठी गोष्ट झालेली आहे. कारण बऱ्याचजणांच्या तारखा कोणत्या ना कोणत्या वेबमालिके साठी आधीच आरक्षित असतात. आपले बजेट, कलाकारांच्या तारखा, तंत्रज्ञ, चित्रीकरण चमूच्या तारखा आणि आर्थिक गणित असं सगळं जुळवताना नक्कीच निर्मात्याची दमछाक होते. त्यामुळेच ओटीटी आले तरीही चित्रपटगृहांचा धंदा कायम राहावा. तो वाढावा, असंच मला वाटतं. कारण या उद्योगावरही आज अनेक घरं चालतात. अनेकांचे संसार उभे आहेत. शिवाय मोठ्या पडद्यावर सिनेगृहात बाकीच्या प्रेक्षकांबरोबर सिनेमा पाहण्याचा आनंद जो घेता येतो, तो मोबाइलच्या पडद्यावरच्या अनुभवापेक्षा संपूर्णत: वेगळाच आहे.

एक कलाकार, निर्माता आणि एक प्रेक्षक अशा तिन्ही भूमिकांतून मला वाटतं की थिएटर्स, ओटीटी यांनी हातात हात घालून चालायला हवं. एकच असावा आणि दुसरं बंद व्हावं, असं मला अजिबातच वाटत नाही.