|| आसिफ बागवान

‘२५ दिन में कुछ बडा होनेवाला है..’ या इशाऱ्यानिशी सुरू झालेल्या ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. गेल्या पाच-सहा महिन्यांपासूनच ‘सॅक्रेड गेम्स’चं नवं पर्व कधी सुरू होणार, याची नेटकरी मंडळी वाट बघत होती. भारतातील पहिली सुपरहिट वेबसीरिज म्हणून नावाजल्या गेलेल्या ‘सॅक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीजनबद्दल खूप आधीपासूनच चर्चा सुरू होती. दोन वर्षांपूर्वी ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ हा प्रश्न जसा रसिकांना सतावत होता, तसंच ‘२५ दिवसांत नेमकं काय होणार आहे’ या प्रश्नाने वेबसीरिजच्या चाहत्यांना छळलं होतं.

‘नेटफ्लिक्स’नं १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ‘सॅक्रेड गेम्स’चा नवा सीजन खुला केला जाईल, असं जाहीर केलं होतं; पण प्रत्यक्षात तो १५ ऑगस्टला सुरुवात करणाऱ्या मध्यरात्रीच्या बाराच्या ठोक्यालाच खुला झाला आणि म्हणता म्हणता त्या रात्रीत अनेकांनी नव्या सीजनचे दोन-तीन भाग रिचवले. आठ भागांच्या या सीजनचा अनेकांनी एका बैठकीतच फडशा पाडला; पण त्यानंतर अचानक या सीजनवर टीका सुरू झाली. १५ ऑगस्टनंतर अवघ्या चार दिवसांत ‘सॅक्रेड गेम्स’वर टीका करणारे किंवा व्यंग करणारे संदेश, मिम, छायाचित्रे, व्हिडीओ यांचा सोशल मीडियावर पाऊस पडू लागला. अनेक समीक्षकांनीही दुसऱ्या पर्वाबाबत नकारात्मक सूर आळवून नेटकरींच्या प्रतिक्रियेला पुष्टीच दिली.

ज्या वेबसीरिजची इतक्या आतुरतेने वाट पाहिली जात होती, त्या वेबसीरिजबद्दल इतका राग? काय कारण असावं? इंटरनेटवर वेगवेगळय़ा माध्यमांतून करण्यात आलेली समीक्षा, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया चाळल्या तर, दुसऱ्या पर्वाबद्दल प्रेक्षकांचा भ्रमनिरास होण्यामागे अनेक कारणे मांडण्यात आल्याचे दिसून आले; पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल? तर ते म्हणजे, पहिल्या पर्वाच्या तुलनेत दुसरं पर्व फिकं पडलय, हे. किंबहुना नेटवरच्या सर्वच परीक्षण, टीका, समीक्षेचा सूर या तुलनेतूनच नकारात्मक झाल्याचं दिसून येतं. म्हणजे, दुसरा भाग चांगला आहे; पण ‘पहिल्यासारखी मजा नाही’ असं म्हणणारे अनेक आहेत. यातूनच स्वतंत्र अर्थ काढला तर, दुसरा भाग वाईटच आहे, असं कुणी म्हणत नाही, हे जाणवतं.

दुसऱ्या पर्वाबद्दलच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा मुख्य रोख त्यातल्या संथ पटकथेकडेही आहे. इथेही पारडय़ाच्या दुसऱ्या बाजूला पहिल्या पर्वाचंच माप ठेवलं गेलं आहे. पहिल्या सीजनमध्ये किती वेगानं घडामोडी घडतात, नवनवी पात्रं उभी राहतात, त्यांचे गूढ उत्कंठा वाढवते, असा एकूण सूर. यामध्ये थरार नाही, शिट्टीफेक संवाद नाहीत, प्रेक्षकाला धरून ठेवणारी पटकथा नाही, अधूनमधून पडणारी विनोदाची फोडणी नाही, असेही आक्षेप आहेतच.

हे सगळे आक्षेप खोटे किंवा तकलादू आहेत, असं म्हणणं योग्य ठरणार नाही; पण त्यातलं तुलनेचं माप बाजूला सारून पाहिलं तर दुसरा सीजन पहिल्यापेक्षा नक्कीच वेगळा तरीही पूरक आहे, हे सांगता येईल. दुसऱ्या सीजनचा बहुतांश पट परदेशातल्या भूमीवर पुढे सरकतो. गायतोंडेच्या आयुष्यातील १९९४ ते २०१७ या कालखंडातील कहाणी आपल्याला त्यात पाहायला मिळते. मुंबई बॉम्बस्फोटानंतर ‘हिंदू डॉन’ बनवण्यात आलेल्या गायतोंडेने केनियात आश्रय घेतला आहे. त्याला हाताशी धरून भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ची अधिकारी कुसुम यादव (अमृता सुभाष) देशाच्या शत्रूंना संपवण्याची मोहीम चालवत आहे. या यंत्रणेचे प्रमुख लक्ष्य शाहीद खान (रणवीर शौरी) आहे; पण गायतोंडेचा जीव त्याचा जुना शत्रू इसा याचा विनाश करण्यात अडकला आहे. यावरून कुसुम यादवशी मतभेद सुरू असताना गायतोंडे गुरुजीच्या (पंकज त्रिपाठी) सान्निध्यात येतो. गायतोंडे गुरुजीच्या आश्रमात पोहोचल्यानंतर कथानकाला नवीन वळण लागतं आणि तो प्रवास थेट वर्तमानापर्यंत येऊन पोहोचतो. हे सुरू असतानाच आपल्याला वर्तमानात सरताज सिंगची गोष्टही समांतरपणे पाहायला मिळते. २५ दिवसांत काय घडणार आहे, याचा शोध घेत घेत सरताजही गुरुजीच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचतो आणि तेथून कथानक शेवटापर्यंत कसं पोहोचतं, हे दुसरा सीजन प्रत्यक्ष पाहूनच जाणून घ्यायला हवं.

१९९४ ते २०१७ असा मोठा कालखंड असला तरी सुरुवातीच्या तीन भागांत गायतोंडेची गोष्ट पटकन पुढे पळते. गुरुजीच्या आश्रमात आल्यावर ती कमालीची संथ होते आणि मग तुकडय़ा- तुकडय़ांत शेवटपर्यंत समोर येते. सरताजची गोष्ट मात्र, संपूर्ण सीजनभर संथपणे सरकत असते. दुसरा सीजन न आवडण्यामागे अनेकांनी या संथपणालाच बोल लावलाय. एखादा थरारपट जेव्हा वेगाने पळतो, तेव्हा तो प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवतो; पण त्यात गतीसातत्य नसेल तर मग प्रेक्षकच तो ‘फास्ट फॉरवर्ड’ करतात. असंच काहीसं ‘सॅक्रेड’च्या दुसऱ्या सीजनबाबत घडलं आहे; पण ते अकारण नाही. तसं होण्याचं मुख्य कारण म्हणजे ‘सॅक्रेड’च्या वर्तुळाचा केंद्रबिंदू गायतोंडेकडून गुरुजीकडे सरकला आहे. पहिलं पर्व म्हणजे, गायतोंडेची गोष्ट होती, तर दुसरं पर्व म्हणजे गुरुजीचं जग आहे. त्यामुळे गुरुजीपर्यंत पोहोचेपर्यंतचा गायतोंडेचा प्रवास कमालीच्या वेगाने सरकतो. तेथे पोहोचल्यानंतर मात्र, त्याला अल्पविराम लागतो. खरं तर पहिल्या पर्वात पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आश्रमात दडलेली आहेत. गुरुजीला भेटण्याआधी गायतोंडे त्रिपाठीला ‘गुरुजीमध्ये इतकं काय आहे’ असं विचारतो, तेव्हा त्रिपाठी ‘गुरुजींकडे सगळय़ा प्रश्नांची उत्तरं आहेत. इथून येणाऱ्या काळात तेच आपले आधार आहेत,’ असं त्याला सांगतो. हे वाक्य खरं तर प्रेक्षकांनाही उद्देशून असतं.

‘सॅक्रेड गेम्स’च्या पहिल्या पर्वात थरारकथेसोबत हिंसाचार, सेक्स आणि विनोद या गोष्टींचा मसालाही ठासून भरला होता. कुणी उघड म्हटलं नाही तरी, पहिल्या सीजनमधील बोल्ड दृश्यं त्याच्या लोकप्रियतेचं एक कारण होतं. दुसऱ्या सीजनमध्ये मात्र ‘सॅक्रेड गेम्स’ पवित्र अवतार धारण करतं. त्यात हिंसाचार आहे, काही बोल्ड दृश्यंही आहेत, पण या सीजनचा गाभा गुरुजीपाशी असल्यामुळे ते सगळं ‘स्पिरिच्युलिटी’च्या पातळीपुरतंच मर्यादित आहे.

पहिल्या पर्वामध्ये गायतोंडे हा क्रूर, बेधडक, बेपर्वा वृत्तीचा एक महत्त्वाकांक्षी डॉन म्हणून आपल्यासमोर येतो. त्याचं शिवराळ बोलणं, बिनधास्त वागणं प्रेक्षकांना भावतं. दुसऱ्या सीजनमध्ये मात्र आपल्याला गायतोंडे कमालीच्या विरुद्ध भूमिकेत दिसतो. इथे त्याला प्रत्येक जण वापरतंय. कुसुम, त्रिपाठी, इसा, गुरुजी, जोजो या सगळय़ा व्यक्तिरेखा त्याला आपल्या मर्जीनुसार नाचवताहेत. त्याला स्वत:ला याची कल्पना आहे; पण तरीही त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. त्याची ही अगतिकता अगदी पहिल्या एपिसोडपासून आपल्यासमोर येते. या अगतिकतेतूनच तो गुरुजीपर्यंत पोहोचतो. कदाचित गायतोंडेमधील हा टोकाचा बदलही प्रेक्षकांना पचनी पडला नसावा.

सरताज सिंग हा या कहाणीचा दुसरा नायक; पण दुसऱ्या पर्वातही तो गोंधळलेला, बुजरा आणि स्वत:च्या प्रश्नांनी ग्रासलेला आहे. एकीकडे मुंबईवरील संकटाचा शोध घेत असताना येत असलेलं अपयश आणि दुसरीकडे कौटुंबिक पातळीवर आलेलं नैराश्य त्याला गुरुजीच्या आश्रमामध्ये नेतं, तेव्हा सरताजही या जाळय़ात सापडणार, असं वाटत असतं. इथे गायतोंडे आणि सरताज यांच्यातला एक समान धागा आहे. तो म्हणजे ‘गोची’. गोची ही आश्रमात आलेल्यांना देण्यात येणारी एक लाल रंगाची गोळी आहे. खरं तर ती एखादा अमली पदार्थच आहे. आश्रमात आलेल्यांना ‘गोची’चं व्यसन लावून त्यांच्या चित्तवृत्तींवर कब्जा करण्याची गुरुजीची शैली त्याची पट्टशिष्य बात्या (कालकी कोचेन) हिनेही आत्मसात केलेली असते. त्यामुळे गुरुजी गेल्यानंतर आश्रम तिच्याच कह्य़ात आहे. या ठिकाणी बात्याबद्दल गायतोंडेला वाटणारी असूया आणि सरताजचं तिच्याशी बोलताना मन मोकळं करणं या दोन गोष्टी समांतरपणे समोर येत असतात.

‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन म्हणजे पहिल्या सीजनमध्ये अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांचं उत्तर आहे. दिग्दर्शकांनी पहिल्या सीजनमध्ये एक मोठा पट रचून त्यावर अनेक व्यक्तिरेखांना उभे केले. या व्यक्तिरेखांचे आपापसातले धागे मात्र मोकळे सोडले. दुसरा सीजन म्हणजे या मोकळय़ा धाग्यांचं एकत्रीकरण आहे. ही गाठ अनेकांना सैल वाटते. त्याच वेळी यातले काही धागे दिग्दर्शकाने उगाच मोकळे सोडल्यासारखेही वाटतात. कदाचित अशाच मोकळय़ा धाग्यांची गाठ बांधणाऱ्या तिसऱ्या सीजनची ती ‘पेरणी’ असावी.

दमदार अभिनय

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, नवाझुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान आणि आधीच्या सीजनमधील कलाकारांनी आपला फॉर्म कायम ठेवला आहे. व्यक्तिरेखेत झालेला बदल नवाजने अतिशय सहजतेने साकारला आहे. गायतोंडेचा अगतिकपणा त्याच्या बोलण्यातूनच नव्हे तर नजर आणि देहबोलीतूनही त्याने उभा केला आहे. सरताजच्या भूमिकेत सैफ इतका समरस वाटतो की, तो सैफ अली खान असल्याचा विचार होतच नाही; पण दुसऱ्या सीजनचे खरे स्टार पंकज त्रिपाठी, कालकी कोचीन आणि अमृता सुभाष आहेत. कुसुम यादवच्या भूमिकेत अमृता सुभाषने रॉच्या अधिकाऱ्यातला करारी आणि कपटीपणा एकाच वेळी अभिनयातून उभा केला आहे. त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात यादवचा भ्रमिष्टपणाही तिनं तितक्याच समर्थपणे उभा केला आहे. पंकज त्रिपाठी या अभिनेत्याला कोणत्याही भूमिकेत सहज शिरता येतं. त्यामुळे गुरुजीच्या भूमिकेत तो चपखल बसला आहे. गुरुजीची संवादफेक, देहबोली, चालणं, नजर या सगळय़ांवर ओशोची छाप असल्याचं वेळोवेळी जाणवतं. अर्थात तेही प्रभावी झालंय. कालकीने गुरुजीची जागा घेणारी बात्या गुरुजीच्याच ढंगात साकारली आहे. त्यामुळे तिची संवादफेक आणि गूढ देहबोली प्रभाव पाडून जाते.