|| रेश्मा राईकवार

‘नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आणि त्याच्यावरही लोकांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या. हा सीझन पहिल्यापेक्षा चांगला आहे की नाही, याबद्दलची तुलना, त्याची गोष्ट, कलाकार आणि या सगळ्या चर्चाना आता कुठे सुरुवात झाली आहे. अर्थात, पहिल्या सीझनबरोबरच या सीझनमध्ये दिसणारे अनेक मराठी कलाकार हे आपल्यासाठी कौतुकाची बाब आहेच; पण ओटीटी प्लॅटफॉर्मचे वाढत चाललेले प्रस्थ, त्यातही नेटफ्लिक्ससारख्या निवडक ओटीटी वाहिन्यांकडून येणाऱ्या वेबसीरिज आणि त्यातून मिळणारी लोकप्रियता या सगळ्याकडे ‘सेक्रेड गेम्स’मध्ये सहभागी झालेले हे कलाकार कशा पद्धतीने पाहतायेत..

उत्तम व्यासपीठ

मी यात रमा नावाच्या एटीएस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे, जी हॅकर आहे. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या आणि देशभर महत्त्वाच्या ठरलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मध्ये काम करायला मिळते आहे, याची उत्सुकता होतीच; पण माझ्याबाबतीत एक वेगळेपण होतं ते म्हणजे इतर अनेक कलाकारांच्या व्यक्तिरेखा या पहिल्या सीझनमधून आलेल्या आणि पुढे गेलेल्या होत्या. माझी व्यक्तिरेखा ही या चालू काळातली होती. त्यामुळे माझ्यावर आधीच्या भूमिकेचं काही दडपणही नव्हतं किंवा प्रस्थापित व्यक्तिरेखेचं समाधानही नव्हतं. शिवाय, माझी व्यक्तिरेखा ही तांत्रिक कामं सांभाळणारी असल्याने मला फारसं भावनिक दृश्याचं दडपण नव्हतं. दिग्दर्शक नीरज घेवान यांनी मला एकच सांगितलं होतं की, तू हॅकर असल्याने लॅपटॉपवर सफाईने आणि वेगाने बोटं फिरली पाहिजेत. इतकोच तपशील देऊन तुमची व्यक्तिरेखा तुमच्या पद्धतीने साकारण्यासाठी दिग्दर्शकाने कलाकारांना वेळ दिला होता, ते स्वातंत्र्य दिलं होतं, जे कलाकारांसाठी खूप महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे इथे मोठे, नावाजलेले कलाकार असं काही वेगळं नव्हतं. सगळे इतके एकत्रितपणे मजा-मस्करी करत काम करत होते. मला वाटतं, मराठी कलाकारांना ज्यांना नवं काही शोधायचं आहे त्यांच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. शिवाय, मराठी कलाकार हे रंगभूमीवरून आलेले असल्याने कुठलीही भूमिका लीलया साकारण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. या माध्यमांना मराठी कलाकारांची गरज आहे आणि मराठी कलाकारांना या सर्वोत्तम भूमिका मिळाल्याच पाहिजेत आणि ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तुमचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतं हेही महत्त्वाचं आहे.     – स्मिता तांबे

 

‘स्थानिक गुणवत्ता सर्वदूर सहज पोहोचते आहे’

मुळात ‘नेटफ्लिक्स’मध्ये काम करणारी बरीचशी टीम, तंत्रज्ञ-कलाकार हे भारतीयच आहेत. शिवाय, आत्ताच्या काळात जिथे मराठी माणसे स्टार्ट अप काढत आहेत, जगभर व्यवसाय पोहोचवतायेत, स्थानिक गुणवत्ता सर्वदूर सहज पोहोचते आहे, तिथे ‘नेटफ्लिक्स’च्या ‘सेक्रेड गेम्स’मध्ये पहिल्यांदाच मराठी कलाकारांनी काम केले आहे, अशी भावना होता कामा नये. मराठी कलाकार हे आधीच जगभर पोहोचलेले आहेत; पण ‘नेटफ्लिक्स’सारख्या माध्यमांनी वेबसीरिज करताना त्यात लिखाणाच्या प्रक्रियेपासूनच गुणवत्तेचा आग्रह धरला आहे. त्यामुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांपर्यंत इतक्या प्रभावीपणे सादर झाली. मी या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनपासून आहे. अनुराग कश्यप कायम नटांना स्वातंत्र्य देतो. नटाला कल्पना समजावून दिल्यानंतर त्याला त्यावर जे जिवंत करायचं आहे त्यासाठीचा अवकाश तो देतो आणि मग ते कॅमेऱ्यात टिपतो. अन्यथा अनेकदा सिनेमात तांत्रिक भाग जास्त असल्याने त्यात हा मुक्ताविष्कार हरवण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे तो सगळ्यांशी सहजपणे आणि बरोबरीने वागतो आणि तिसरे म्हणजे या स्वातंत्र्यातही आता तुम्ही काही तरी चांगले करून दाखवा हे त्याचे आव्हान असते. ‘सेक्रेड गेम्स’च्या बाबतीत तर त्याच्या कथेसाठी खूप संशोधन करून ती लिहिली गेली होती. त्याचा कित्येक वेळा सरावही झालेला होता आणि त्या कथेसाठी तितक्याच चांगल्या कलाकारांचा आग्रह ‘नेटफ्लिक्स’ने धरला. एखाद्या चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाही इतकं चैतन्याने सळसळलेलं वातावरण ‘सेक्रेड गेम्स’च्या सेटवर होतं. यामुळे या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही तसाच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.       – गिरीश कुलकर्णी

 

‘.. त्यांना सलाम करण्याची छोटीशी संधी’

‘सेक्रेड गेम्स’ ही विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित वेबसीरिज आहे, तर त्या कादंबरीत रॉ एजंटची व्यक्तिरेखा ही पुरुषी होती. लेखक वरुण ग्रोवर आणि दिग्दर्शक नीरज घेवान यांनी मात्र कुसुम देवी यादव ही स्त्री व्यक्तिरेखा निर्माण केली. केनियात राहून गायतोंडेसारख्या गुंडाचा वापर करत देशाच्या सुरक्षिततेसाठी काम करणारी ही रॉ एजंट आहे. ही भूमिका कशी मिळाली, हा अनुभवही विलक्षण आहे. ‘गल्ली बॉय’नंतर आईच्याच भूमिका मिळणार, असं बोललं जात होतं. मला स्वत:ला काहीतरी वेगळंच करायचं होतं. मी त्याच विचारात पार्लरमध्ये जाऊन केस कापले आणि छोटय़ा केसांची स्टाइल ठेवली. त्या वेळी मला नवाझुद्दीन सिद्दीकीने ‘मंटो’ या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी आमंत्रित केलं. त्या प्रीमिअरमध्ये या छोटय़ा लुकमध्ये मला दिग्दर्शक-लेखक जोडीने पाहिलं आणि केडी यादवच्या ऑडिशनसाठी विचारणा झाली. या भूमिकेच्या निमित्ताने मला पहिल्यांदाच कुठलाही चेहरा नसताना, आपल्याला केलेल्या कामाचे कौतूक केले जाणार नाही, याची खात्री असताना अनेक एजंट देशासाठी जे काम जगभर करतायेत त्याची जाणीव झाली. त्यांचे काम शब्दांपलीकडचे आहे. आपली खरी ओळख, भावभावना लपवून ही मंडळी काम करतात. माझी ही भूमिका म्हणजे त्यांना सलाम करण्याची छोटीशी संधी आहे, असं मी मानते. चित्रपटात गायतोंडेला नाचवणारी ही व्यक्तिरेखा लोकांना इतकी आवडली की काही मुली तिच्या चष्म्याची जी स्टाइल आहे, तसे चष्मे वापरतायेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत इतकी वेगळी आणि पहिल्यांदाच अ‍ॅक्शनदृश्येही केली असलेली अशी ही व्यक्तिरेखा आहे. हिंदीत विशेषत: अनुराग-नवाझच्या तोंडी मराठी चित्रपट आणि क लाकारांबद्दल कायम कौतूकाचे बोल बाहेर पडत असतात. मराठीत नागराज, उमेश, अविनाश अरुणसारखी तरुण मुलं खूप धाडसीपणाने चांगले चित्रपट देत आहेत, असे अनुराग नेहमी म्हणतो. मराठी कलावंतांना मिळणारी ही दाद अभिमानास्पद वाटते.        – अमृता सुभाष

 

‘काम सर्वदूर पोहोचतं ’

मला आधीपासूनच ‘नेटफ्लिक्स’सारख्या माध्यमांचं कौतुक आहे कारण त्या प्लॅटफॉर्मवरून आपलं काम जगभर पोहोचतं. ‘सेक्रेड गेम्स’च्या बाबतीत बोलायचं तर मी त्याचा चाहता होतो. पहिला सीझन पाहून मी भारावून गेलो होतो, त्यावर मी समाजमाध्यमावर सविस्तरपणे लिहिलंही होतं. मी त्यावर इतकं बोललो होतो, लिहिलं होतं, की पहिला सीझन संपल्यावर पाच-सहा महिन्यांनी जेव्हा मला दुसऱ्या सीझनसाठी फोनवरून विचारणा झाली तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी तरी गंमत केली असावी, असं वाटून मी फोन ठेवून दिला होता. मात्र पुन्हा एकदा पाहू म्हणून मीच फोन केला. त्यानंतर ऑडिशन, निवड झाली. तेव्हाही मी थोडा संदिग्ध होतो. माझी भूमिका किती महत्त्वाची आहे, अशी शंका माझ्या मनात होती. दिग्दर्शक नीरज घेवान यांनी मला उत्तम मराठीत समजावून सांगितलं की, मी तुझं काम पाहिलेलं आहे. तू कशा प्रकारचा कलाकार आहेस हेही चांगलं माहिती आहे. त्यामुळे यात तुझी भूमिका कमी लांबीची असली तरी ती खूप चांगली आहे. त्या वेळी आपलं काम अनेक जण पाहात असतात, हे मला लक्षात आलं. म्हणजे आपण मराठीत काम करतो आहोत, ते कोणाला माहिती असणार, असा एक विचार असतो; पण इथे तसं नव्हतं. अगदी सैफ अली खान यांनाही मी ‘फास्टर फे णे’सारखा चित्रपट केला आहे आणि तो खूप यशस्वी झाला हे माहिती होतं. ‘सेक्रेड गेम्स’च्या सेटवर सगळे मिळून मिसळून काम करत होते. खरं म्हटलं तर त्या टीमवर सतत ताण असतो, कारण एकेक तासाचे आठ भाग त्यांना काढायचे होते. मात्र इतकं उत्तम व्यवस्थापन होतं, की त्या ताणातही चांगलं काम होत होतं. आशय आणि मांडणीच्या बाबतीत मी मराठीत उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्यात वेगळेपणा जाणवला नाही. माझ्यासाठी हाच मुद्दा महत्त्वाचा होता, की या व्यासपीठावरून आपलं काम वेगाने जगभर पोहोचतं. ऑडिशन कुठे तरी मुंबईत झालेली असते, चित्रीकरण कोळीवाडय़ात आणि वेबसीरिज जगभर प्रदर्शित होते. हे या माध्यमाचे महत्त्व आहे.         – अमेय वाघ

 

‘क्षमतांचा पुरेपूर वापर’

मी ‘सेक्रेड गेम्स’च्या आताच्या पर्वात नाही आहे. भूतकाळात थोडाफार उल्लेख येतो; पण गेल्या काही दिवसांत मी ‘सेक्रेड गेम्स’ केली, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ केली आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’साठी ‘ब्रीथ’च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केलं आहे. वेबसीरिजचा आशय आणि त्याची मांडणी ही थोडीशी धाडसी, सर्जनशील आहे असं मला वाटतं. मालिकांच्या बाबतीत ते कुटुंबासह पाहिलं जाणारं माध्यम असल्याने तिथे आशयाला मर्यादा येतात, कौटुंबिक आशयाच्या चौकटीपल्याड फारसं जाता येत नाही. चित्रपटांच्या बाबतीतही पुन्हा ते एकत्र पाहिले जातात आणि तिथेही मग व्यावसायिक  – प्रायोगिक असा फरक केला जातो. हे वेबसीरिजच्या बाबतीत घडत नाही. मराठी कलाकारांकडे रंगभूमीचे संस्कार असल्याने त्यांच्याकडून तर या वेबसीरिजमधून उत्तम काम करून घेतलं जातं, त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला जातो, असा माझा अनुभव आहे. दिग्दर्शक नागेश कुक्कनूर यांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये अनेक मराठी कलाकारांबरोबर काम केलं. ते म्हणाले की, मी इतकं उत्तम काम केलं, आता अन्य कुठल्या कलाकारांबरोबर काम करण्याची इच्छाच होत नाही. अर्थात, अजूनही मराठी व्यक्तिरेखा असतील तर मराठी कलाकार हा विचार पुसला गेलेला नाही; पण हे समजही लवकरच गळून पडतील याची मला खात्री आहे.         – विभावरी देशपांडे