17 July 2019

News Flash

Video : निर्भया बलात्कार प्रकरणावर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज; पाहा ट्रेलर

निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या संपूर्ण तपासावर या सीरिजची कथा आधारित आहे.

दिल्ली क्राइम

संपूर्ण देशभरात महिला अत्याचाराविरुद्ध संतापाची लाट पसरवणारं निर्भया प्रकरण २०१२ मध्ये डिसेंबर महिन्यात घडलं होतं. या प्रकरणाने न्यायवस्थेला बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षेच्या तरतुदीवर पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडलं. माणूस इतक्या खालच्या पातळीवर उतरु शकतो, याची जाणीव करून देणाऱ्या या प्रकरणाने देशभरात संतापाचा डोंब उसळला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘दिल्ली क्राइम’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर येत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या संपूर्ण तपासावर या सीरिजची कथा आधारित आहे. इंडो-कॅनेडियन दिग्दर्शक रिची मेहताने याचं दिग्दर्शन केलं असून शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, गोपाल दत्त आणि विनोद शेरावत यांच्या मुख्य भूमिका आहेत. शेफाली शाह महिला पोलीस अधिकारी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध एका महिला पोलीस अधिकारीने कसा घेतला याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

गेल्या सहा वर्षांपासून या वेबसीरिजसाठी संशोधन सुरू होतं. दिल्लीतल्या सहा ठिकाणी या वेबसीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. रिची मेहताची ही वेबसीरिज आहे. रिचीनं ‘अमाल’, ‘आय विल फॉलो यु डाऊन’, ‘सिद्धार्थ’ अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २२ मार्चला ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

गेल्याच वर्षी निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित ‘दिल्ली बस’ हा चित्रपट देखील आला होता. या घटनेवर आधारित लेस्ली उडविन यांचा ‘इंडियाज़ डॉटर’ हा माहितीपटही आला होता. यामुळे मोठा वाद भारतात निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदीही घालण्यात आली होती.

First Published on March 15, 2019 4:43 pm

Web Title: netflix series on nirbhaya rape case delhi crime trailer out