News Flash

गुपितांचा खेळ

पहिल्या सीझनमध्ये तसे सूतोवाच असेल तर कथानक पुढे नेताना फारसा त्रास होत नाही.

वेबवाला : सुहास जोशी

एखादी कलाकृती यशस्वी झाली की, त्यानंतर तिचे आणखीन व्हर्शन्स करण्याचा मोह हमखास होतोच. पण दरवेळी हा मोह पहिल्या इतकाच यशस्वी ठरतो असे होत नाही. अनेक वेबसीरिजच्या बाबतीत ही बाब अगदी ठळकपणे दिसून येते. एखाद्या सीरिजचा पहिला सीझन तुफान यशस्वी वगैरे झाला की हमखास दुसऱ्या सीझनचा विचार सुरू होतो, अर्थात पहिल्या सीझनमध्ये तसे सूतोवाच असेल तर कथानक पुढे नेताना फारसा त्रास होत नाही. पण तसे नसेल तर कथानक ताणले जाते. थर्टीन रिझन्स व्हायच्या बाबतीत हे सारं काहीसं संमिश्र झालं आहे. पहिल्या सीझनमध्ये त्या तेरा कारणांचा वेध घेतल्यानंतर, तेरा कारणांच्या पलीकडे जाणारा दुसरा सीझन आला. तोदेखील बऱ्यापैकी यशस्वी झाला. तेथेच मूळ कथा वाढवली होती. नुकताच तिसरा सीझनदेखील आला. कथानकाचे वळण येथे बदलले आहे, मात्र याचा प्रभाव काहीसा संमिश्र असाच आहे हे मान्य करावे लागेल.

दुसऱ्या सीझनच्या शेवटाला टायलर बंदुका घेऊन ब्राइस वॉकरला मारायला जातो. क्ले जेन्सनमध्ये पडल्यामुळे तो थांबतो. तिसऱ्या सीझनची सुरुवात होते तीच मुळी ब्राइस वॉकर गायब झाला, या घटनेपासून. पोलीस त्याचा तपास करत असतात आणि त्याच वेळी लिबर्टी हायस्कूलमधील सर्वजण दबक्या आवाजात एकमेकांवर संशय व्यक्त करत राहतात. तर ब्राइसने सर्वाधिक छळ केलेली जेसिका डेव्हिस ही हायस्कूलमधील विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष म्हणून निवडून येते. मागील दोन्ही सीझनमध्ये हॅना ही निवेदकाच्या भूमिकेत असल्यासारखी सतत ऐकायला मिळते, तिसऱ्या सीझनला अनी हे नवीन पात्र काम हाती घेते. अनीची आई ब्राइस वॉकरच्या नवीन घरी कामाला आणि राहायला असते. अनी आणि क्ले दोघेही अनेक शक्याशक्यता पडताळून पाहत असतात. त्याच वेळी ब्राइसचा मृतदेह नदीकिनारी सापडतो. मग पोलिसांच्या तपासाला आणखीनच वेग येतो. एकीकडे क्ले आणि अनी, त्यांच्या मित्रांबरोबर यातील अनेक घटनांचा विचार करत असतात, तर पोलीस चौकशीचा ससेमिरा वाढलेला असतो. खुनी कोण? अशा मोडमध्येच सारी कथा पुढे जात असली तरी त्यातून अनेक छोटीमोठी गुपितं उघड होऊ लागतात. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणेच एक विचित्र कोंडी येथेदेखील असते.

१३ रिझन्स व्हाय ही मूळ कथा ज्या हॅनावर आहे, ती या सीझनमधून पूर्णपणे बाहेर आहे. त्यामुळेच तिच्याशी निगडित घटनांच्या पलीकडेदेखील अनेक घडामोडी आहेत, ज्यांच्या परिणाम या पौगंडावस्थेतील मुलांवर झालेला आहे आणि होत आहे हे ठसवण्यात काही प्रमाणात सीरिजकर्ते यशस्वी ठरतात. त्याच वेळी ब्राइस वॉकरला केवळ हॅना आणि इतर काही बाजूनेच गेल्या दोन सीझनमध्ये पाहिले जाते, येथे मात्र ब्राइसचे आणखीनच कंगोरे दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे घरकाम करणारी अनी. किंबहुना तिच्याच चष्म्यातून खूप साऱ्या गोष्टी आपण पाहतो. हा एकच बदल मागील दोन सीझनपासून या सीझनला वेगळे करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. पण त्याच वेळी तो तितका प्रभावीदेखील ठरत नाही हे मान्य करावे लागेल.

सीझनचा सारा भर हा ब्राइसचा खुनी कोण हाच आहे. प्रत्येक वेळी एखाद्या संशयिताशी क्ले आणि अनी बोलताना त्यातून आणखीनच नवीन गुपित उलगडते, हा ट्विस्ट बऱ्यापैकी जमला आहे. दिग्दर्शकाचे कौशल्य यातच आहे. किंबहुना हा सीझन दिग्दर्शकाने या मुद्दयावरच बेतला आहे. या मुलांचे प्रत्येकाचे काही ना काही तरी गुपित आहे आणि त्याचमुळे ते एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे हा सीझन म्हणजे गुपितांचा खेळ झाला आहे. पण ही क्लृप्ती सोडली तर एकूणच या सीझनचा प्रभाव तुलनेने कमीच आहे हे मान्य करावे लागेल.

अर्थातच मागील दोन्ही सीझनप्रमाणे प्रभावी संकलन येथेदेखील आहेच. वेगवेगळ्या काळातून कथा फिरवत फिरवत पुढे न्यायची हे प्रभावीपणे दिसून येते. अनी हे नवीन पात्र तर अगदी चपखल म्हणावे असे निवडले आहे. त्या पात्राची गरज, वाव हा भाग बाजूला ठेवला तरी तिचा एकूणच सीझनमधील वावर हा अगदी सहजसुलभ झाला आहे.

एकूणच या सीरिजवर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या दोनतीन वर्षांत जगभरात भरपूर चर्चा झाली. त्यातून पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत काही चांगल्या तर आत्महत्यांसारख्या काही धक्कादायक घटनादेखील घडल्या. तिसरा सीझन येणार का यावरदेखील बरेच प्रश्न होते. त्या सर्व घडामोडीतून तिसरा सीझन आला, अनेकांनी या तिसऱ्याची गरज काय? असादेखील प्रश्न उपस्थित केला. अर्थात हा सीझन प्रदर्शित झालेला असल्याने गरज होती की नव्हती हा मुद्दा बाजूला ठेवून तो पाहायला हरकत नाही. अर्थात पहिल्या दोन सीझनची पूर्वपुण्याई त्याबरोबर असली तरी सीरिजकर्त्यांनी थोडी अधिक मेहनत घ्यायला काहीच हरकत नव्हती, इतकंच.

– थर्टीन रिझन्स व्हाय सीझन तिसरा ऑनलाईन अप झ्र्नेटफ्लिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 1:52 am

Web Title: netflix web series 13 reasons why akp 94
Next Stories
1 नव्या मालिकांचा सुसाट प्रवास
2 भुताळी वस्त्रकथा!
3 Video : आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीविरोधात प्राजक्ता माळीचा एल्गार
Just Now!
X