ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स भारतीय आशय, विषय असलेल्या मजकुराच्या निर्मितीवर भर देणार आहे. त्यासाठी नेटफ्लिक्स भारतामध्ये ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नेटफ्लिक्सचे संस्थापक आणि सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी ही माहिती दिली. भारतीय आशय, विषय असलेले चित्रपट, वेबसीरीजच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहेत. प्रेक्षकांना लवकरच ते दिसून येईल असे हेस्टिंग्स यांनी सांगितले.

२०१६ साली भारतात दाखल झाल्यापासून आम्ही गुंतवणूक करत आहोत. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि स्पेनमधून भरपूर कंटेट आमच्याकडे उपलब्ध आहे. आता आम्ही भारतीय कंटेट डेव्हल्प करत आहोत असे हेस्टिंग्स म्हणाले. “चालू वर्षात आणि पुढच्या वर्षीपर्यंत भारतात आम्ही ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून तुम्हाला मोठया प्रमाणात भारतीय आशय, विषयाचा कंटेट स्क्रिनवर पाहायला मिळेल. मुंबईत आमचे १०० कर्मचारी असून हजारो कर्मचारी दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत आहेत” असे हेस्टिंग्स हिंदुस्थान टाइम्सच्या कार्यक्रमात म्हणाले.

सेक्रेडे गेम्स, दिल्ली क्राईम, लिटिल थिंग्स या भारतीय आशय असलेल्या वेब सीरीज नेटफ्लिक्सवर हिट ठरल्या आहेत. पुढची पाच-दहा वर्ष टेलिव्हिजनसाठी सोनेरी काळ असणार आहे. या क्षेत्रात मोठया प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे असे हेस्टिंग्स म्हणाले.