काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. पण आता या सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत लव्ह जिहादला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जात आहे. ट्विटरवर हॅशटॅग बॉयकॉट नेटफ्लिक्स देखील ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे.

‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या काळावर आधारित असल्याचे दिसत आहे. या सीरिजमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. लता मेहेरा आणि कबीर दुर्रानी ही दोन पात्रे मंदिराच्या परिसरात एकमेंकांना चुंबन करताना सीरिजमधील एका भागात दाखवण्यात आले आहे. या दृश्यांवर भाजपचे गौरव तिवारी यांनी अक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

गौरव यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘नेटफ्लिक्सवरील अ सुटेबल बॉय या वेब सीरिजमधील एकाच भागात तिन वेळा मंदिराच्या परिसरात चुंबन दृश्य दाखवण्यात आले आहे. सीरिजच्या कथेनुसार हिंदू मुलगी मुस्लीम मुलावर प्रेम करत असते, पण सगळी चुंबनदृश्ये ही मंदिराच्या परिसरात का चित्रीत करण्यात आली?’ असे गौरव यांनी ट्विटमध्ये म्हटले असून पुढे त्यांनी या विरोधात एफआयआर दाखल केला असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी ‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज लव्ह जिहादला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी तनिष्कच्या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आला होता. या जाहिरातीवर लव्ह जिहादला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला होता.