सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर हे त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी कठिण काळात होणाऱ्या गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार असे म्हणत केलेल्या ट्वीटला उत्तर दिले होते. अनुपम खेर यांनी उत्तर देत ‘घाबरु नका. येणार तर मोदीच’ असे म्हटले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

अनुपम खेर यांनी ट्वीटमध्ये शेखर यांना उत्तर देत म्हटले होते की, ‘आदरणीय शेखर गुप्ताजी. हे जरा जास्तच झालं. तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. करोनाही एक आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. आपण या माहामारीचा या पूर्वी कधीही सामना केला नव्हता. सरकारवर टीका करणे गरेजेचे आहे. पण करोनाचा सामना करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घाबरु नका. येणार तर मोदीच.’ अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे समर्थन केलेले पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

एका नेटकऱ्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन यांच्या फोटोवर ‘कलंक आहेस तू कलंक’ असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने ‘वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे दररोज हजारो लोक भारतात मरत असताना अनुपम खेर यांनी आज येणार तर मोदीच असे म्हटले. त्या पेक्षा कलाकारांनी न बोललेलं बरं’ असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते शेखर गुप्ता?
‘मी नैसर्गिक आपत्ती, युद्ध, अन्नटंचाई अशा अनेक परिस्थिती पाहिल्या आहेत. पण पाळणीनंतर आलेले हे सर्वात मोठे संकट आहे आणि भारताने यापूर्वी कधीही असं अकार्यक्षम सरकार पाहिलं नव्हतं. कोणतेही नियंत्रण कक्ष नाही, कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रशासनाचा आभाव आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.