ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या विवाहसोहळ्याचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सुरु आहे. मोठ्या दिमाखात आणि राजेशाही थाटाला साजेशा अंदाजात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात बऱ्याच मान्यवर अतिथींची उपस्थिती पाहायला मिळाली. या शाही विवाहसोहळ्यात मुख्य आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल आणि इतर सर्वच आमंत्रितांचा पोषाख.

शाही विवाहसोहळा म्हटल्यावर तिथे पोषाखाच्या बाबतीतही काही शिष्टाचार पाळावे लागतात, ज्याची सुरेख झलक सर्वच उपस्थितांकडून पाहायला मिळाली. जवळपास आठशे आमंत्रितांच्या या गर्दीत ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची हजेरीसुद्धा पाहायला मिळाली. सेलिब्रिटी स्टायलिस्ट मिमी कटरेलने डिझाइन केलेल्या लूकमध्ये प्रियांकाने या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. लिलॅक विविअॅने वेस्टवूड आऊटफिटमध्ये ती अत्यंत सुरेख दिसत होती. तिच्या या लूकची अनेकांनीच प्रशंसाही केली. पण, त्याचवेळी देसी गर्लच्या या लूकवर टीकाही झाली.

समता पार्टीच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांनी प्रियांकाने शाही विवाहसोहळ्यात साडी नेसून हजेरी न लावल्यामुळे निराशा व्यक्त केली.