हिंदी कलाविश्वातील नवोदित चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या सारा अली खान हिने नुकतीच मुंबईतील मुक्तेश्वर शनी मंदिरात भेट दिली. यावेळी तिची आई, अभिनेत्री अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम खानही तिच्यासोबत होते. मंदिरात देवाची आराधना केल्यानंतर सारा आणि ईब्राहिमने बाहेर असणाऱ्या गरजूंना खाद्यपदार्थ दान केले.

मंदिराबाहेर साराला पाहून तिची एक झलक टीपण्यासाठी तेथे छायाचित्रकारांनी गर्दी केली. पण, धार्मिक स्थळी त्यांचं हे असं वागणं तिला खटकलं आणि तिथे असणाऱ्या छायाचित्रकारांना तिने खडसावलं. सोशल मीडियावर या साऱ्याचा एक व्हिडिओ बराच चर्चेत आला. ज्यानंतर सारावर काही संकुचित विचाराच्या नेटकऱ्यांनी आगपाखडही केल्याचं पाहायला मिळालं.

https://www.instagram.com/p/Bm6TCBah_n2/

साराचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खान हा मुस्लिम धर्मीय असून, तिची आई हिंदू आहे. हीच गोष्ट अधोरेखित करत एका युजरने साराने तिचं नाव बदलावं असा सल्ला दिला. ‘तू फक्त नवाब कुटुंबाची असल्यामुळेच हे नाव वापरत असलीस तर हा त्या नावाचा गैरवापर आहे’, असं आणखी एका युजरने स्पष्ट केलं. तर एका युजरने सारा हे सर्व पैसे आणि प्रसिद्धीसाठी करत असल्याचं विधान कमेंट बॉक्समध्ये केलं.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रटीचं ट्रोल होण्याची किंवा नेटकऱ्यांनी त्या सेलिब्रिटींवर आगपाखड करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण, भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या राष्ट्रात आजही धर्माच्या मुद्द्यावरुन अनेकांच्या मनात चुकीच्या भावना आणि समजुती आहेत हीच शोकांतिका या कमेंटमधून पाहायला मिळाली.