अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. या यादीत आता दिया मिर्झा हिचं देखील नाव जोडलं गेलं. ही अभिनेत्री अंमली पदार्थांचं सेवन करते, असा संशय एनसीबीला आहे. मात्र कुठलीही कारवाई होण्यापुर्वीच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

“आयुष्यात कधीही मी अंमली पदार्थ किंवा प्रतिबंधक पदार्थांचं सेवन केलेलं नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.” अशा आशयाचं ट्विट दियाने केलं आहे. या ट्विटद्वारे तिने होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. आज तकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.