हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित ‘फॅण्टम’ हा चित्रपट म्हणजे मुंबईवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला २६/११ नंतरचा त्या घटनेवरील आणखी एक गल्लाभरू चित्रपट आहे. अर्थात लंडन, कॅनडा, बैरूट अशा ठिकाणी एकामागून एक वेगवान घटनांचा पट उलगडत जाताना मध्यांतरापर्यंत तरी चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु मध्यांतरानंतर निव्वळ अ‍ॅक्शनपट म्हणूनच गणला जाईल. पाकिस्तानातील लाहोर तसेच सीरियासारख्या देशातील चित्रण अतिरंजितच म्हणावे लागेल.
२६/११च्या घटनेनंतर लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा आधार लेखक-दिग्दर्शकांनी घेतला आहे. भारतावरील दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी रॉ ही गुप्तहेर संस्था एक कट रचते. भारतातील दहशतवादी हल्ल्यांची  सूत्रे हलवणाऱ्या दहशतवाद्यांना निरनिराळ्या देशांनी आपल्या कैदेत ठेवलेले आहे असे दाखविले असून, त्यांना त्या त्या देशात जाऊन जीवे मारायचे आणि अपघात असल्याचे दाखवायचे असा हा कट रॉ ही गुप्तहेर संस्था आखते. यासाठी एक निलंबित लष्करी अधिकारी नादियाल खान याची निवड केली जाते. नादियाल खानची ही प्रमुख भूमिका सैफ अली खानने साकारली आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये एका देशात नादियाल खान एका माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यावरून तेथील तुरुंगात जातो असे दाखविले आहे. नंतर फ्लॅशबॅकमधून नादियाल खानची निवड रॉ या संस्थेने का केली, कशी केली याचे तपशील चांगल्या प्रकारे दाखविले आहेत. नंतर पुन्हा तुरुंगात गेलेला नादियाल खान नेमका कशासाठी तुरुंगात जातो, त्यामागचा हेतू, त्याचे काम फत्ते झाल्यावर तो तुरुंगातून बाहेरही पडतो असे दाखविले आहे. दहशतवादी कारवाया, दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार, त्यासाठी गुप्तपणे निरनिराळ्या देशात काम करणाऱ्या यंत्रणा, प्रत्यक्ष दहशतवादी कसे असतील, त्याचे दर्शन चित्रपटातून घडविले आहे. २६/११च्या हल्ल्याच्या कटाची आखणी करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या अतिरेक्यांना नादियाल खान कसा ठार करतो हा चित्रपटाचा मुख्य भाग आहे.
उत्कंठावर्धक वेगवान अ‍ॅक्शन दृश्यांची रेलचेल हा हॉलीवूड चित्रपटांमधील दृश्यांसारखा भाग प्रेक्षकांची करमणूक निश्चितच करतो. परंतु, मध्यांतरानंतर चित्रपटाला दिलेला तद्दन बॉलीवूड पद्धतीचा बाज यामुळे चित्रपट फिका पडतो. ‘एक था टायगर’ आणि ‘एजंट विनोद’ या चित्रपटांशी साम्य राखत दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी केली आहे. कतरिना कैफच्या ‘एक था टायगर’मधील भूमिकेप्रमाणेच या चित्रपटातही तिला भूमिका देण्यात आली आहे.
दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या नादियाल खानच्या क्लृप्ती हा प्रेक्षणीय व वेगवान भाग आहे हे नक्की. परंतु या वेगाला आणि कथानकाचे नादियाल खान-नवाझ मेस्त्री ही जोडी लाहोरमध्ये गेल्यानंतर दाखविलेला घटनाक्रम तद्दन अतिरंजित आहे. आणखी एक अ‍ॅक्शनपट एवढेच वर्णन या चित्रपटाचे करावे लागेल.

फॅण्टम
निर्माते
– साजिद नाडियादवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक – कबीर खान
मूळ पुस्तक – हुसैन झैदी लिखित ‘मुंबई अ‍ॅव्हेंजर्स’वर आधारित
लेखक – कबीर खान, कौसर मुनीर
कथा-पटकथा – कबीर खान, परवीझ शेख
छायालेखन – असीम मिश्रा
संकलन – आरिफ शेख, आदित्य बॅनर्जी
संगीत – प्रीतम, कोमल शायन (केके)
कलावंत सैफ अली खान, कतरिना कैफ, मोहम्मद झिशान अय्यूब, सब्यसाची चक्रवर्ती, राजेश तेलंग, पवन चोप्रा व अन्य.