नियामक मंडळ सदस्यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत नरेश गडेकर यांची अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. परंतु नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी एक व्यक्ती असताना दुसरी व्यक्ती ते पद स्वीकारू शकते का, असा नवा वाद सुरू झाला आहे.

नियामक मंडळ सदस्य योगेश सोमण यांनी ही विशेष बैठक अवैध असल्याचा दावा करून बैठकीत घडलेला प्रकार पूर्वनियोजित आणि एककल्ली होता, असे सांगत निषेध व्यक्त केला आहे.

नियामक मंडळ सदस्यांच्या विशेष बैठकीला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी ही बैठक यशवंतराव नाटय़ मंदिराच्या तालीम सभागृहात घेण्यात आली.

नियमाक मंडळाच्या ५९ सदस्यांपैकी या बैठकीला ३९ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी ३७ सदस्यांनी प्रसाद कांबळी यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली. दोन तटस्थ मते वगळता उर्वरित सदस्यांचे बहुमत घेऊन नव्या अध्यक्षांची तातडीने घोषणाही करण्यात आली. परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांना अध्यक्ष पद देण्यात आले. त्याचप्रमाणे नव्या समितीत प्रवक्ता म्हणून भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली. मात्र, ही निवड आणि बैठक वैध आहे का यावरून आता वाद सुरू झाला आहे.

पंधरा दिवसांत निवडणूक

‘न्यायालयाने आम्हाला बैठकीची परवानगी दिली होती. त्यामुळे कायदेशीर मार्गानेच आम्ही जात आहोत. अध्यक्षांच्या अहंपणाला वैतागून आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो. अध्यक्ष बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून उपाध्यक्ष गडेकर यांना अध्यक्षपदी नेमले. निवडणूक होईपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतील.’ अशी प्रतिक्रिया भोईर यांनी दिली. येत्या पंधरा दिवसात निवडणूक जाहीर करून ५९ सदस्यांमधून अध्यक्षांची निवड केली जाईल, असेही ते म्हणाले.

आरोपांवर चर्चा नाही..

अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी १६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत काही सदस्यांवर आरोप केले होते. त्याबाबत मात्र या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. भाऊसाहेब भोईर, विजय चौघुले, सविता मालपेकर, सुशांत शेलार, विजय गोखले, सुनील महाजन, योगेश सोमण, विणा लोकूर, सुरेश धोत्रे, मुकूंद पटवर्धन आणि इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

सोमण यांच्याकडून ‘निषेध’

नियामक मंडळ सदस्य योगेश सोमण यांनी या विशेष बैठकीत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘बैठकीत अध्यक्षांना हटवण्याची मागणी करण्यात आली. तत्काळ नवे अध्यक्ष नेमण्यात आले. परंतु अशी कोणतीही तरतूद परिषदेच्या घटनेत नाही, त्यामुळे ही सभा अवैध ठरते. एवढेच नव्हे तर कांबळी यांच्या एककल्ली कारभाराला विरोध करणाऱ्या सतीश लोटके यांचीही या बैठकीत मनमानी दिसून आली. बैठकीत काय करायचे, बोलायचे हे पूर्वनियोजित होते. त्यामुळे अशा चुकीच्या प्रक्रियेला माझा विरोध आहे,’ असे विधान सोमण यांनी के ले आहे.

न्यायालयाने बैठकीला परवानगी दिल्याने त्या निर्णयाचा मला आदर आहे. परंतु बैठक वैध की अवैध या बाबत आदेशात कुठेही उल्लेख नाही. नियामक मंडळ सदस्यांची सभा घेण्याचा अधिकार प्रमुख कार्यवाहकांकडे असतो, जे या प्रक्रियेत कुठेही नव्हते. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह हे विश्वस्तांपैकी एक असतात. त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्तांव्यतिरिक्त कुणालाही नाही.

– प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय नाटय़ परिषद