27 November 2020

News Flash

सिनेमाचा नवा चेहरा

सगळ्या गर्दीत बिग बजेट चित्रपटांपेक्षाही छोटय़ा चित्रपटांनी कमाल केली.

हिंदी चित्रपटांची व्यावसायिक गणितं मोठी असल्याने बिग बजेट चित्रपट, ‘स्टारकलाकार आणि तितकेच स्टारकिंवा प्रथितयश दिग्दर्शक ही रुळलेली समीकरणं सहजी बदलणारी नाहीत. तद्दन व्यावसायिक चित्रपट देणारे दिग्दर्शक जसे या प्रथितयश दिग्दर्शकांच्या मांदियाळीत आहेत तसेच आशय-विषयातील मांडणीवर भर देत व्यावसायिक मूल्यं सांभाळून वेगळे चित्रपट देण्याचा प्रयत्न करणारे इम्तियाज अली, कबीर खान, आर. बाल्की, आनंद एल. राय यांच्यासारखेही दिग्दर्शक आहेत. या वर्षभराचा ताळेबंद मांडला तर या सगळ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे व्यावसायिकतेच्या चौकटीत राहून सिनेमा देण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र यातल्या अनेकांना अपयश आलं. या सगळ्या गर्दीत बिग बजेट चित्रपटांपेक्षाही छोटय़ा चित्रपटांनी कमाल केली. गेली काही र्वष सातत्याने छोटे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत आणि गल्लाही जमा करताहेत. मात्र या वेळी त्यापुढे जात अनेक नव्या विचारांचे दिग्दर्शक या वर्षी तिकीटबारीवर गाजले. यात नवोदित दिग्दर्शकांची संख्या मोठी असली तरी एक-दोनच चित्रपट करून सातत्याने चांगल्या चित्रपटांच्या प्रयत्नांत असलेल्या काही तरुण चेहऱ्यांची, त्यांच्या नव्या विचारांच्या-प्रवाहाच्या चित्रपटांची दखल इंडस्ट्रीलाही घ्यावी लागली..

एकीकडे विशाल भारद्वाज, कबीर खान, इम्तियाज अली, रामगोपाल वर्मा, शाद अली अशी नामी दिग्दर्शक मंडळी बॉक्स ऑफिसवर कोलमडून पडली. मात्र त्याच वेळी काही नवीन दिग्दर्शकांच्या चित्रपटांनी लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. यातले सगळे दिग्दर्शक नवीन नसले तरी त्यांच्या नावावर एखाददुसरा चित्रपट दिग्दर्शक म्हणून जमा आहे, अशी मंडळी यात खूप आहेत. या यादीत सध्या तरी अमित मसूरकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दिग्दर्शक म्हणून ‘न्यूटन’ हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. याआधी त्याने ‘सुलेमानी किडा’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याला ‘न्यूटन’एवढं यश मिळालं नसलं तरी तोही चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अमितने दोन लघुपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. नक्षलवादी भागातील निवडणूक प्रक्रिया, मतदार गोळा करण्यापासून त्यांची मतं जमा करण्यासाठी केला जाणारा खटाटोप हे सगळंच खरं म्हणजे लोकशाहीच्या तत्त्वाला हरताळ फासणारं आहे. ‘न्यूटन’मधून हाच विषय हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर मांडत आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर टिप्पणी करण्याचं कामही दिग्दर्शकाने अचूक केलं आहे. चांगला विषय आणि उत्तम कलाकार यांची सांगड घालून चित्रपट करण्याचं धाडस ही मंडळी करताना दिसतात. ‘न्यूटन’मध्ये राजकुमार राव, रघुवीर यादव आणि पंकज त्रिपाठी असे तीन चांगले मोहोरे एकत्र बांधत या छोटेखानी चित्रपटाची नीट मोट बांधण्याचा प्रयत्न जसा अमित मसूरकरसाठी लाभदायी ठरला. तसाच प्रयत्न ‘बरेली की बर्फी’साठी अश्विनी अय्यर तिवारीने केला. बरेलीसारख्या शहरातील आजचा तरुण कसा आहे, तिथल्या तरुणींची मानसिकता, छोटय़ा गावातील तरुण पिढीला असलेली शहरांची ओढ अशा अनेक गोष्टींना चित्रपट हलकेच स्पर्श करतो. नेहमीच्याच प्रेमकथेचा ढाचा वापरतानाही दिग्दर्शिकेने दिलेले हे छोटे छोटे बारकावे प्रेक्षकांना जास्त आपलेसे वाटतात. या चित्रपटासाठीही अश्विनी अय्यर तिवारी यांनी राजकुमार राव, आयुषमान खुराणा आणि क्रिती सनन असं वेगळंच त्रिकूट बांधलं. अर्थातच, चित्रपटाला त्याचा फायदा झाला.

ताकदीच्या कलाकारांना त्यांच्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर काढून आव्हानात्मक विषयांमध्ये हाताळण्याचं तंत्र या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांना चांगलं अवगत आहे. त्यामुळेच रत्ना पाठक शहा, कोंकणा सेन शर्मा, आहाना कुमरा अशी नव्या-जुन्या कलाकारांना घेऊन अलंकृता श्रीवास्तवने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारखा चित्रपट दिला. प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला, नियोजित तारखेपेक्षा दीर्घकाळ रखडलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्सऑफिसही दणाणलं. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चे दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांचाही दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट नव्हता. संकलक म्हणून हिंदी चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेल्या श्री नारायण सिंग यांनी लोकांच्या नेहमीच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि तरीही सरकारी जाहिरातींशिवाय कधीही उघडपणे न बोलला जाणारा विषय पडद्यावर आणला. घरात शौचायल असणं ही गरज आहे आणि गावागावांतून स्त्रिया या गरजेपासून किंबहुना त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. दर वेळी कुठला तरी ग्लॅमरस विषय, चकाचक कपडय़ांतील नायक-नायिका असा सगळा मामला असेल तरच चित्रपट चालतात, हे म्हणणंच या मंडळींनी खोडून टाकलं आहे. आपल्याच मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय नव्या विचारांच्या या दिग्दर्शकांनी मोठय़ा कलाकारांच्या माध्यमातून पडद्यावर आणले आणि लोकप्रिय केले.

नवोदित दिग्दर्शकोंची संख्याही मोठी!

प्रस्थापितांच्या बरोबरीने उभं राहत आपल्याला हवं ते सांगणारा चित्रपट करणं बॉलीवूडमध्ये शिरणाऱ्या मंडळींसाठी अंमळ अवघड गोष्ट आहे. मात्र गेल्या काही वर्षांचा ताळेबंद मांडला तर प्रस्थापितांनाही विचार करावा लागेल, अशी परिस्थिती प्रेक्षकांनी निर्माण केली आहे. अमुक एक प्रकारचे चित्रपट चालतात, हे छातीठोकपणे सांगणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे सातत्याने प्रयोग करत राहणं हे ओघाने आलंच. मात्र असं असूनही अतिशय हिमतीने आपल्याला हवे ते विषय घेऊन येणाऱ्या नवोदित दिग्दर्शकोंचं प्रमाण या वर्षी जास्त आहे. गेली काही र्वष सक्षम अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटांना आपली दखल घ्यायला लावणाऱ्या कोंकणा सेन शर्माने दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलत पहिला चित्रपट करताना रहस्यपटाची निवड केली. ‘अ डेथ इन द गुंज’ हा तिचा चित्रपट लोकांना भलताच आवडला. ‘अनारकली ऑफ आरा’ देणारा अविनाश दास, मोक्ष म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर त्या दिशेने जायचा मार्ग स्वेच्छेने निवडणाऱ्या तरुणाची कथा सांगणारा ‘मुक्ती भवन’ या चित्रपटाचा दिग्दर्शक शुभाशिष भुतियानी, मनीषा कोईरालाची मुख्य भूमिका असलेल्या ‘डीअर माया’ चित्रपटाची दिग्दर्शक सुनयना भटनागर, ‘ऑनर किलिंग’चा विषय मांडणारा ‘जी कुत्ता से’चा दिग्दर्शक राहुल दहिया असे नवे दिग्दर्शकांचे चेहरे या वर्षी इंडस्ट्रीने पाहिले.

नवोदित असूनही व्यावसायिकतेची गणितं सांभाळत चांगला विषय देण्याचं धाडस जवळपास या सगळ्याच नवोदित दिग्दर्शकांनी केलं आहे. आमिर खान आणि ‘दंगल’ गर्ल झायरा वासिम यांना एकत्र आणत ‘सिक्रेट सुपरस्टार’सारखा चित्रपट अद्वैत चंदन या दिग्दर्शकाने दिला. तर विद्या बालनला गृहिणी ते रात्रीचा शो चालवणारी आरजे म्हणून लोकांसमोर आणणाऱ्या सुरेश त्रिवेणीचा ‘तुम्हारी सुलू’ही बॉक्सॅऑफिसवर हिट ठरला. जाहिरातींच्या दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असलेल्या रवी उदयावर यांनी श्रीदेवी आणि नवाझुद्दीन सिद्दिकी अशा दोन ताकदवान कलाकारांना एकमेकांसमोर आणत ‘मॉम’सारखा चित्रपट दिला. याशिवाय, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मामि महोत्सवात गाजलेला देवाशिष माखिजा यांच्या ‘आजी’चेही कौतूक झाले. कधी पूर्णपणे नवीन कलाकारांबरोबर काम करत तर कधी आपल्या विषयाला-भूमिकेला न्याय देऊ शकेल, अशा मोठय़ा कलाकारांना विचारून त्यांना आव्हानात्मक भूमिकेत लोकांसमोर आणण्याचं काम ही नवोदित दिग्दर्शक मंडळी सहजतेने करताना दिसतायेत. यातले काही प्रयोग चालले, काही फसले तरी आव्हानात्मक  विषय मांडणीतील वैविध्यांसह देणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चालतात आणि लोकांनाही ते आवडतात हे लक्षात आल्यानंतर हिंदीतील अमिताभ बच्चन, आमिर खानसारखे मोठमोठे कलाकारही छोटय़ा पण नव्या प्रवाहातील दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाठिंबा देताना दिसतायेत. या पाठिंब्याचं फळ चित्रपट उद्योगाला कलेक्शनच्या रूपाने मिळालं आहे. त्यामुळे या वर्षभराचा ताळेबंद मांडतना हिट आणि फ्लॉपच्या गणितावर लक्ष देण्यापेक्षा पहिल्याच प्रयत्नात लोकांच्या जिव्हाळ्याचे, त्यांच्या रोजच्या जगण्याचे विषय मांडत चांगले चित्रपट देणारे हे नवोदित दिग्दर्शक बॉलीवूडसाठी जमेची बाजू ठरले आहेत. ही जमेची पुंजी येत्या नवीन वर्षांत आणखी आशयघन, दर्जेदार चित्रपटांची संपत्ती देईल, अशी आशा चित्रपटप्रेमींनाही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 12:46 am

Web Title: new face of the movie bollywood movie
Next Stories
1 देशी गाण्यांचा परदेशी डंका
2 एकमताचे ‘असेही एक साहित्य संमेलन’!
3 नाट्यरंग : ‘अंदाज आपला आपला’ ओन्ली संतोष पवार!
Just Now!
X