डझनावारी कॅमेराधारी.. त्याहून अधिक तांत्रिक चमू.. वेशभूषाकार.. केशभूषाकार यांच्या संगतीने लाइट- कॅमेरा- अ‍ॅक्शनच्या मंत्रावर वायुवेगाने धावणारी कलाकार- अभिनेत्यांची लगबग आणि शेकडो हौशा-गवशा प्रेक्षक- स्ट्रगलर्सच्या वेढय़ात सुरू राहणारी मुंबईच्या मायानगरीतील चित्रीकरणाची परंपरा करोनामुळे पूर्णपणे बदलणार आहे.

मार्च महिन्यापासून मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणाला लागलेले टाळे पुढच्या काही महिन्यांत तरी सुटेल अशी अटकळ बांधून त्या दृष्टीने काय काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर प्राथमिक स्तरावर निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. सिंटा आणि वेस्टर्न फे डरेशन ऑफ एम्प्लॉईज यांच्यात झालेल्या पहिल्या बैठकीत यासंबंधीचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या काळात चित्रीकरण व्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार असून सर्व उपाययोजना लक्षात घेत अनेक बदल करावे लागणार असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

अनेक बदल ..

कॅमेऱ्याचे युनिट्स उचलण्यासाठी, ने-आण करण्यासाठी किमान चार माणसे लागतात. तेथे अंतर राखणे अशक्य असते. मेकअपच्या बाबतीतही अनेक कलाकारांना घरच्या घरी स्वत:चा मेकअप करता येत नाही. त्यामुळे यात बदल होईल, अशी माहिती आयरिस प्रॉडक्शनचे विद्याधर पाठारे यांनी दिली. या बदलांमुळे निर्मिती संस्थांबरोबरच वाहिन्यांचाही खर्च वाढणार आहे ही बाब त्यांनी नमूद केली. निर्मात्यांना बरीच काळजी घ्यावी लागेल, मात्र प्रत्यक्षात सरकारकडून परवानगी मिळत नाही तोवर चित्रीकरण सुरू होणार नाही, असे निर्माता नितीन वैद्य यांनी स्पष्ट केले.

नव्या रचनेनुसार.. सेटवर कमीत कमी लोक असतील, कलाकारांच्या नियमितपणे वैद्यकीय तपासण्या होतील, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक, कलाकार-तंत्रज्ञांना मुखपट्टय़ा आणि इतर सुरक्षासाहित्याचा पुरवठा होईल, त्याचबरोबर सेटवर डॉक्टरही उपलब्ध करावा लागेल, या बाबींचे  ब्रॉडकास्टर्स म्हणून आम्ही पालन करू असे ‘कलर्स मराठी’चे व्यवसायप्रमुख निखिल साने यांनी सांगितले. या सर्व बाबी तपासण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रीकरणाचे सारे स्वरूपच यातून बदलणार आहे.