समांतर चित्रपटाच्या चळवळीने अभिरुचीची नवी वाट चोखाळून रोजच्या जगण्याच्या विषयांना कलात्मकता बहाल केली. तसेच चित्रपटातील भूमिकांचा सूक्ष्म आणि बारकाईने विचार करून जनसामान्यांचे रोजचे प्रश्न मांडले. त्यातून नवीन वैचारिक मांडणी केली. चित्रपटसृष्टीला आविष्काराची दिशा दिली, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र, दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी आणि विश्वास बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत मतकरी यांचे ‘समांतर चित्रपट आणि भारतीय चित्रपटसृष्टी’ या विषयांवर दृकश्राव्य व्याख्यान प्रतिष्टानच्या सभागृहात झाले. मतकरी यांनी चित्रपटाव्दारे प्रेक्षक घडविण्याच्या प्रक्रियेची सुरूवात होत असल्याचे नमूद केले. विचारदर्शक वास्तववादी विचार आणि नाविन्याचा शोध यातून समोर आला. त्यामुळे चित्रपटसृष्टीला नवा आयाम मिळाला. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, बासु चटर्जी, केतन मेहता या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपटांचा प्रेक्षक घडवल्याचे मत त्यांनी मांडले. प्रास्तविक राजेश हिवरे यांनी केले. मतकरी यांचा परिचय रघुनाथ फडणीस यांनी करून दिला. त्यांचा सन्मान डॉ. श्याम अष्टेकर यांच्या हस्ते झाला.