14 October 2019

News Flash

Video : ‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमई’चा तडका

नव्या दमाचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लग्नकार्य असो किंवा एखादी पार्टी सध्या सर्वत्र एकाच मराठी गाण्याची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘खंडेराया झाली माझी दैना… दैना रे… तिच्याविना जीव माझा राहीना…’ गुलाबी थंडीत उमलणाऱ्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या या गाण्याने अनेक जोड्या जुळवल्या असून मराठी सिंगल अल्बम्सचे सगळे ठोकताळे मोडीत काढल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रेडिशनल गाण्याला दिलेल्या रोमँटिक टचमुळे ‘खंडेराया झाली माझी दैना’ या गाण्याने महिन्याभरातच तब्ब्ल १९ मिलियन व्ह्यूज तर लाखोंनी लाईक्स मिळवले. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर पुन्हा एकदा एव्हरेस्ट मराठी एन्टरटेंमेंट आणि चेतन गरुड यांच्या संयुक्तविद्यमाने नव्या दमाचं धमाल रोमॅण्टिक कोळी गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

अमित बाईंग दिग्दर्शित आणि प्रविण शिंदे, पूजा कासकर यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीत रंगलेलं ‘सुरमई’ हे कोळी गीत रसिक-प्रेक्षकांना भेटीला आलं असून हे गाणं अबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला ताल धरायला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पिंपळगाव हरेश्वर या छोट्याशा गावातील चेतन रवींद्र गरुड या तरुणाने २०१८ मध्ये मराठी सिंगल अल्बममध्ये ‘खंडेराया झाली माझी दैना’ हे सर्वात लोकप्रिय गाणं मराठी प्रेक्षकांना दिलं जे सर्वत्र जोरदार वाजलं आणि गाजलं देखील. आत्ता प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून त्यांनी आपलं दुसरं गाणं २०१९ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.

कोळीगीतांची आजही क्रेझ काही कमी झालेली नाही म्हणूनच ते ‘सुरमई’ हे रोमॅण्टिक कोळीगीत आपल्यासाठी घेऊन आले आहेत. या गाण्याचे बोल प्रवीण बांदकर यांचे असून त्याला संगीत सुद्धा त्यांचेच आहे. शिवाय या तडकत्या-भडकत्या कोळी गीताला आदर्श शिंदे यांच्या आवाजाने चारचाँद लावले आहेत. ‘सुरमई’ला अमित बाईंग यांचं नृत्य-दिगदर्शन लाभले असून लॉरेन्स यांच्या छायांकनानं अल्बममधील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम आपल्याला प्रेमात पाडायला भाग पाडते तर या गाण्याचे संकलन अभिषेक ओझा यांनी केले आहे. ‘खंडेराया’ नंतर आता ‘सुरमई’ला ही प्रेक्षक पसंती लाभेल यात काही शंका नाही.

First Published on January 12, 2019 12:01 pm

Web Title: new koli song is surmai tadka