सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात अडकला आहे. बरेच दिवस घरात अडकल्यामुळे आता प्रत्येक नागरिक कंटाळला आहे. तसंच कलाविश्वातील कामकाज ठप्प असल्यामुळे नवे चित्रपट, मालिका असं काहीही प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. मात्र घरात बसून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी सेलिब्रिटी कसोशीने प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रेक्षक, चाहते यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यातच आता किस्से बहाद्दर या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना नाटकाच्या पडद्यामागील कलाकारांचे भन्नाट किस्से ऐकता येणार आहेत.

बऱ्याच वेळा नाटकाच्या प्रयोगादरम्यान किंवा पडद्यामागे कलाकारांचे भन्नाट किस्से घडत असतात. त्यांच्यातही अनेक विनोद, मज्जा-मस्करी होत असते. आता त्यांच्या याच धम्माल गोष्टी ते ‘किस्से बहाद्दर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या काही आठवणी आणि मजेदार किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

विप्लवा एंटरटेनमेंटस् आणि पॅलेट मोशन पिक्चर्सनिर्मिती हे भन्नाट किस्से प्रेक्षकांना स्वरंग मराठी या वाहिनीवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, शशांक केतकर आदी मान्यवर कलाकार सहभागी झाले आहेत. तर सचिन सुरेशने सूत्रसंचालन केलं असून कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवतने केलं आहे. दरम्यान, हा कार्यक्रम स्वरंग मराठीच्या युट्युब चॅनेल आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.