छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अनेक संकटं आली. मात्र, कोणत्याही मावळ्याने महाराजांची साथ सोडली नाही. निडरपणे प्रत्येक जण येणाऱ्या संकटाला समोरे गेले. यातील अनेक मावळ्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम हा देशातील प्रत्येक जनतेला माहित आहे. विशेष म्हणजे महाराजांचा विश्वासू मावळा बर्हिजी नाईक यांचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.

निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर म्हणून ‘बहिर्जी नाईक’ यांची ओळख होती. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी : स्वराज्याचा तिसरा डोळा’ या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. मंदाकिनी काकडे निर्मिती बहिर्जी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. किरण माने लिखित या चित्रपटाची निर्मिती काक माय एन्टरटेन्मेंट अंतर्गत होणार आहे.

दरम्यान, या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांची नावं गुलदस्त्यात आहेत.