बिबट्या म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. या नावाशी अनेकांचे वेगवेगळे अनुभव , भावना , कथा जोडलेल्या आहेत. याच नावाचा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘बिबट्या’ या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या सिनेमाची निर्मिती स्वयंभू प्रॅाडक्शनची असून या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे.सिनेमाच्या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेलं शहर दिसतंय आणि लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे.या सिनेमाचं पोस्टर एक गूढता निर्माण करतं.

बिबट्याचं भविष्य अंधारात?
या सिनेमात विजय पाटकर , महेश कोकाटे , अनंत जोग , प्रमोद पवार , डॉ विलास उजवणे , अशोक कुलकर्णी , ज्ञानदा कदम , मनश्री पाठक , सचिन गवळी , सोमनाथ तडवळकर , सुभोद पवार , अशी कलाकार मंडळी आहे. बिबट्याच्या काळ्या आकृतीवरून बिबट्याचं भविष्य अंधारात आहे असं तर दिग्दर्शकाला सुचवायचं नसेल? असा प्रश्न निर्माण होतो. . हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या सिनेमाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे आणि आर. मौजे यांची असून या सिनेमाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत.

पोस्टरवरील नाव देखील अगदी लक्षवेधक आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो. शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही. तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.हाच विषय घेऊन हा सिनेमा येत आहे कि कोणता नवीन विषय मांडणार आहे. दिग्दर्शकाला हाच विषय का निवडावासा वाटला.या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

सिनेमाच्या पहिल्याच पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलंय एवढं नक्की.