‘लागीर झालं जी’ फेम निखिल चव्हाणचा अभिनयक्षेत्राचा आलेख दिवसागणिक उंचावत चालला आहे. चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरीजचा एकामागून-एक धडाका लावणारा निखिल आता लवकरच एका प्रेमवीराची भूमिका साकारणार आहे. आगामी धोंडी चंप्या : एक प्रेमकथा या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री सायली पाटील स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

धोंडी चंप्या : एक प्रेमकथा हा विनोदीपट असून या चित्रपटातून अनेक हास्यलहरी उठणार आहे. निखिलसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या सायलीने यापूर्वी ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका, ‘बॉईज’ चित्रपट आणि ‘स्त्रीलिंग-पुल्लिंग’ वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.  निखिल चव्हाण अभिनित झी ५ वरील ‘वीरगती’ तर, शुद्ध देसी मराठीची ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या वेबसीरीज अलीकडेच प्रचंड गाजल्या. निखिलने आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत पण ‘धोंडी चंप्या’ या चित्रपटाची बातच न्यारी आहे. या चित्रपटाद्वारे निखिल प्रथमच लीड रोलमध्ये दिसेल. शिवाय हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट असल्यामुळे रसिकांना निखिलमधला नवा अभिनयपैलू पाहायला मिळेल.

मजेशीर कथानकाला कलाकारांच्या अभिनयाने जो काही तडका दिलाय त्याने प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होणार यात काही शंका नाही. एका गावातील तालेवार बागायतदार उमाजी आणि अंकुश यांच्यात चालत आलेल्या परंपरागत वैरामुळे धोंडी आणि चंप्या बळी पडतात. उमाजी म्हणजेच भारत जाधव आणि अंकुश म्हणजेच वैभव मांगले यांच्या मुलांच्या भूमिकेत निखिल आणि सायली दिसतील. वडीलांप्रमाने भांडता भांडता निखिल आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि प्रेमाचा लपंडाव आणखी जोरोशोरोसे चालू होतो. धोंडी आणि चंप्याची प्रेमकथा सफल करण्यात निखिल आणि सायली यशस्वी होतात का हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.

‘अनोळखी हे घर माझे’, ‘गोलमाल’, ‘बेधुंद’ यांसारख्या चित्रपटांचे तर ‘कॉमेडी एक्स्प्रेस’, ‘आंबट गोड’, ‘कॉमेडी डॉट कॅम, ‘साहेब बीबी आणि मी’, ‘कोपरखळी’ यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन करणारे ज्ञानेश भालेकरांनी ‘धोंडी चंप्या’ चे दिग्दर्शन केले आहे. कुठल्याही कथानकाला विनोदी ढाच्यात सामावून घेत रसिकांपुढे मांडण्याचं ज्ञानेश भालेकरांचं कसब वाखाणण्याजोगं आहे.