कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेला अभिनेता म्हणजे रवी काळे. मराठी– हिंदीसह तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत रवी यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांची एक वेगळीच भूमिका पहायला मिळणार आहे.

माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणाऱ्या बाबू पवार या घोडेस्वाराची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या भूमिकेसोबतच वडील आणि मुलीच्या नात्याचं हळवं रूपसुद्धा प्रेक्षकांना यात पहायला मिळणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वडील आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत तिच्या अनोख्या मैत्रीचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात, याचा संवेदनशील प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.  ‘आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी प्रतिमा आहे त्यापेक्षा या भूमिकेमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल स्वीकारला. शिस्तप्रिय, कठोर पण हळव्या आदर्श वडिलांची ही भूमिका प्रत्येक वडील स्वत:शी रीलेट करू शकतील’, असं रवी काळे म्हणाले.

माथेरानमधील नयनरम्य ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं असून यात नवोदित अभिनेत्री जानकी पाठक, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव, आदि कलाकारांच्या मांदियाळी दिसून येणार आहे.