सध्या सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. सध्या देशावर करोनाचं सावट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यावर अनेकांचा भर आहे. मात्र, या काळात गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या एका लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मी बाप्पा बोलतोय’, असं या लघुपटाचं नाव असून नुकताच तो प्रदर्शित झाला आहे.

भावेश पाटील दिग्दर्शित ‘मी बाप्पा बोलतोय’ हा लघुपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या लॉकडाउनच्या काळात आतापर्यत अनेक हिंदी, मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. मात्र आता लघुपटदेखील प्रदर्शित झाला आहे.

साडे आठ मिनीटांचा असलेल्या या लघुपटाचं नंदुरबारमध्ये चित्रीकरण झालं असून यातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. “मी बाप्पा बोलतोय या लघुपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हा लघुपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”, असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या लघुपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका भावेश पाटील यांनी पार पाडली आहे. यापूर्वी त्यांनी ‘रहस्य’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरला होता.