लोकसंगीतातील हुकमी एक्का आणि ठसकेबाज आवाजाने मराठी गाण्यांवर आपला ठसा उमटविणारे गायक आनंद शिंदे ‘कोंबडी पळाली’ नंतर आता ‘कोंबडा पळाला लंडनला’ असे म्हणत श्रोत्यांपुढे येणार आहेत. ‘जॅकपॉट’ या आगामी मराठी चित्रपटासाठी शिंदे यांनी हे नवे गाणे गायले असून नुकतेच ते ध्वनिमुद्रितही करण्यात आले.
शिंदे यांनी गायलेल्या ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ या गाण्याची लोकप्रियता इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. त्यानंतर लोकसंगीताच्या बाजातील शिंदे यांनी गायलेली ‘डोकं फिरलया बयेचं डोकं फिरलया’ ते अगदी ‘रेगे’ चित्रपटातील ‘गाडी सुटली शिट्टी वाजली, अन्..’ या अलीकडच्या गाण्यापर्यंत सर्वच गाणी हिट ठरली. लग्न किंवा मिरवणुकीत बॅण्डवर आजही हमखास ही गाणी वाजविली जातात. ‘जॅकपॉट’ या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘कोंबडा पळाला लंडनला जॅकपॉट लागलाय सगळ्यांना’ हे नवे गाणे नुकतेच ध्वनिमुद्रित केले आहे. महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या या गाण्यात ‘जॅकपॉट’ चित्रपटाचे सर्व सार मांडले आहे.
दाक्षिणात्य स्वरूपातील या ठसकेबाज आणि उडत्या चालीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे यांचाच आवाज योग्य असल्याने हे गाणे शिंदे यांनीच गावे, यासाठी खिल्लारे आणि संगीतकार नीलेश माळी आग्रही होते. शिंदे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनीही होकार दिला आणि ‘कोंबडा पळाला’ला शिंदे यांचा आवाज लाभला. चित्रपटात काही नव्या कलाकारांसोबत उषा नाडकर्णी, अनंत जोग, नागेश भोसले, भाऊ कदम आदी कलाकार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.