अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण सुरु झालं आहे . त्यामुळे सध्या प्रेक्षकांना अनेक नवीन मालिका पाहायला मिळत आहेत. यामध्येच ‘ऑनलाइन लग्नाची सुपरफाइन गोष्ट- शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून एक भन्नाट कथा प्रेक्षकांना अनुभवायचा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

‘ऑनलाइन लग्नाची सुपरफाइन गोष्ट- शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून एका लग्नाची हटके गोष्ट उलगडली जाणार आहे. लग्नसराई म्हटलं की दोन कुटुंबातील लग्नाची बोलणी, मानपान, लग्नाची धामधूम, आनंद, खरेदीची लगबग हे सारं काही दिसून येतं. मात्र या ऑनलाइनच्या जमान्यात सारं काही एका व्हिडीओ कॉलवर होतं. त्यामुळेच शंतनू आणि शर्वरी यांच्या लग्नदेखील ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे या लग्नात कोणती धमाल घडते ते या मालिकेतून पाहायला मिळेल. या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

“या नव्या भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे. कारण लॉकडाऊन नंतरची माझी ही पहिलीच मालिका आहे. गेले काही महिने मी टेलिव्हिजनवर काम करत नव्हतो. पण जेव्हा या मालिकेबद्दल विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. ऑडीशन्स, वर्कशॉप्स सगळं ऑनलाईन सुरू होतं. त्यामुळे लॉकडाऊननंतर काहीतरी वेगळं करणार आहोत ही भावना मनामध्ये होती. कलर्स मराठीसोबत पुन्हा एकदा मालिका करण्याची संधी मिळते याचा उत्साह आहे, कान्हाज मॅजिक निर्मित ही पहिलीच मालिका आहे आणि मला त्याचा भाग होता आलं याचा देखील आनंद आहे. शुभमंगल ऑनलाईन मालिकेद्वारे आम्हाला सध्याची सगळ्यात गोष्ट सांगायला मिळते आहे ही एक जमेची बाजू आहे, त्याची एक वेगळी मजा आहे आणि प्रेक्षकांना हे बघायला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे,” असं सुयश म्हणाला.

“कलर्स मराठीसोबत खूप दिवसांपासून काम करायचे होते आणि शेवटी तो क्षण आला आणि त्यामुळे खूप जास्त उत्सुक आहे. दुसरं कारण म्हणजे सायली जशी आहे तशी खूप लोकांना माहिती नाहीये. कुठेतरी शर्वरी आणि सायलीमध्ये खूप साम्य आहे. शर्वरी या पात्राच्या सगळेच प्रेमात पडतील याची मला खात्री आहे. कारण मुळातच ते तितकं गोड आहे. खरं सांगायचं तर या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आली. ही मालिका करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते,” असं सायली म्हणाली.

दरम्यान, या मालिकेची निर्मिती सुबोध भावे करत असून दिग्दर्शन वैभव चिंचाळकर करत आहे. तर सायली संजीव आणि सुयश टिळक यांच्यासोबत सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. ही नवी मालिका येत्या २८ सप्टेंबरपासून ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.