चित्रपटाच्या सहनिर्मात्यांमध्ये नाशिकचे दोघे

मराठी चित्रपट दर्जेदार असतात. त्याचा आशय विषय मांडणीसह सर्वच बाबतीत अव्वल असताना केवळ प्रसिद्धीमुळे मागे पडतात. ही अडचण लक्षात घेत प्रथमच ब्रॉडकास्ट प्रदर्शनासह फेसबुकसह अन्य नवमाध्यमांच्या वापर ‘मुरांबा’ या चित्रपटासाठी करण्यात आला आहे. या चित्रपटात नाशिकचे कौस्तुभ धामणे व अमेय पाटील यांनी सहनिर्माते म्हणून जबाबदारी पेलली आहे.

‘मुरांबा’ चित्रपटातील आलोक आणि इंदू अर्थात अमेय वाघ व मिथिला पालकर यांची धूम सुरू आहे. दशमी क्रिएशन्स प्रस्तुत ह्य़ुज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स निर्मित ‘मुरांबा’ हा चित्रपट आई-वडील आणि मुले यांच्यातील नातेसंबंधाच्या बदलत्या स्वरूपाकडे तीक्ष्ण नजरेने आणि एका विशिष्ट विचाराने बघतो. आजच्या तरुणाईच्या मनातील स्पंदने टिपत त्यांच्या भावविश्वात बदलत्या जीवनशैलीमुळे सरमिसळ होत असताना इतर नात्यांमुळे नात्यांची गुंफण अधिकच कशी घट्ट होते याकडे ‘मुरांबा’ने लक्ष वेधले आहे.

अमेयसह वेब सीरिज अभिनेत्री मिथिला, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटास जसराज, सौरभ आणि द्विषिकेश यांनी संगीत दिले आहे. मिथिला पालकर आणि जसराज जोशी यांनी गायलेलं ‘मुरांबा’ हे गाणं आणि त्यानंतर अमेयच्याच आवाजातलं ‘चुकतंय’ हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

धामणे यांनी आपले अनुभव कथन केले. चंदेरी पडदा खुणावत असताना एखाद्या चित्रपटाची निर्मिती करावी ही इच्छा होती. ज्या वेळी ‘मुरांबा’ची कथा, त्यासाठी काम करणारी मंडळी समोर आली, तेव्हा कुठलाही विचार न करता हा चित्रपट सहनिर्माता म्हणून स्वीकारला. सहनिर्माता म्हणून पहिलाच चित्रपट असल्याने चित्रपट निर्मितीचा प्रवास जवळून अनुभवता आला.

कलाकारांची फौज दमदार असल्याने त्यांच्या सोबत काम करण्यास मजा आल्याचे त्याने सांगितले. अमेय पाटीलने हा चित्रपट आजच्या पिढीचा असला तरी कुटुंबासमवेत तो पाहण्याची मजा काही और असल्याचे नमूद केले. चित्रपट पाहताना प्रत्येकाला वाटेल की ही आपल्या घरातील गोष्ट आहे. निर्मितीचा पहिला अनुभव सुखद असून दिग्दर्शक वरुण व अन्य कलाकार मंडळी यांच्यामुळे काम करण्याचा आनंद घेता आल्याचे त्याने सांगितले. २ जून रोजी चित्रपट राज्यात प्रदर्शित होत आहे.

मिथिलाचे अमराठी प्रेक्षक पाहता पडद्यावर इंग्रजीमध्ये ‘सबटायटल्स’ दाखविण्यात येणार असल्याने चित्रपट समजण्यास अडचण येणार नाही. तसेच तो अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहचावा, यासाठी ‘ब्रॉडकास्ट रिलीज’चा वापर मराठी सिनेसृष्टीत प्रथमच करण्यात आल्याचे नाशिककर सहनिर्मात्यांनी सांगितले.

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या संकल्पनेला मिळत असल्याने चित्रपटास यश मिळेल, असा विश्वास ‘मुरांबा’ चित्रपटाचे सहनिर्माते कौस्तुभ धामणे यांनी व्यक्त केला.